पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/154

हे पान प्रमाणित केलेले आहे.

 गणराज्याच्या वर्धापनदिनी फडकविलेला राष्ट्रध्वज उतरविण्याचा कार्यक्रम पाच दिवसांनी मावळत्या सूर्याच्या साक्षीने आणि स्कॉटलंडमधील बॅगपाईप वाद्यांच्या सुरांवर होऊ लागला.
 भारतीय तसे उत्सवप्रिय; पंडितजी त्यातल्या त्यात रसिकराज. त्यांची सगळी जीवनशैलीच पाश्चिमात्य. राष्ट्रीय महोत्सव कसे साजरे करायचे याचा सगळा तपशील बारकाव्यांसह ते स्वतः लक्ष घालून ठरवीत. १५ ऑगस्टच्या पहाटे ऐतिहासिक लाल कित्याच्या बुरुजावरील झेंडावंदन; २६ जानेवारीला राजपथावरील परेड, झेंडा उतरविण्याचा कार्यक्रम हे सगळे त्यांच्या प्रतिभेचे आविष्कार. महात्माजींची हत्या झाली ती पहिल्या स्वातंत्र्यदिनानंतर साडेचार महिन्यात. महात्माजींचा अंत्यविधी कसा व्हावा, त्यांचे समाधीस्थान कसे असावे हेही पंडितजींनी स्वतःच ठरविले. त्यानंतर दिल्लीत अंत्यविधी झालेले सारे पंतप्रधान विश्रांती घेत पहुडले आहेत. ते पंडितजींनी ठरविलेल्या ठशाच्या समाधीस्थानांत.
 भारताचे हे राष्ट्रीय महोत्सव जगभर प्रसिद्ध आहेत. झेंडा उतरविण्याच्या कार्यक्रमाच्या वेळी स्कॉटलंडमधील संगिताचा जो जलसा होतो तसा खुद्द स्कॉटलंडमध्येही पहावयास किंवा ऐकावयास मिळत नाही अशी कुत्सित कबुली खुद्द स्कॉटलंडमधील लोकही देतात आणि त्याबद्दल आनंद वाटण्याऐवजी खऱ्याखुऱ्या भारतीयांच्या माना शरमेने खाली होतील.
 वर्षांमागून वर्षे गेली. स्वातंत्र्यदिन आले आणि गेले. स्वातंत्र्यदिन सरकारी बनला. राज्याच्या पातळीवर राज्यपाल, जिल्ह्याच्या पातळीवर जिल्हाधिकारी, तालुक्याच्या पातळीवर मामलेदार खात्याच्या खाक्याप्रमाणे स्वातंत्र्यदिनाचा समारंभ पार पाडू लागले. प्रमुख अधिकाऱ्याने या दिवशी राष्ट्रीय वेष परिधान करावा, झेंडा फडकवावा आणि आपण प्रतिनेहरूनच आहोत अशा थाटात समोरच्या कनिष्ठ नोकरदारांना भाषण सुनवावे अशी प्रथा पडून गेली. देशाने प्रगती किती केली. अजून बाकी राहिलेल्या समस्या किती मोठ्या आहेत. त्या सोडविण्यासाठी सर्वांनी देशभक्तीने प्रेरित होऊन त्याग-प्रसंगी बलिदान करण्यासही कसे सज्ज राहिले पाहिजे असे भाषण झेंडा फडकविणारे हे लोक करू लागले. वेगवेगळ्या खात्यांत याच्याच आवृत्या होऊ लागल्या.

 स्वातंत्र्यदिनाच्या महोत्सवाचा खरा जाच होतो तो शाळेतील विद्यार्थ्यांना. त्यांचा बिचाऱ्यांचा काहीच अपराध नसताना त्यांना भल्या पहाटे उठून शाळेत जावे लागले; झेंडावंनदचा कार्यक्रम पार पाडावा लागतो, रटाळा कंटाळवाणे भाषण ऐकावे लागते, मैल मैल मिरवणुकीत चालावे लागते, ज्यांचा अर्थ समजत

भारतासाठी । १५४