पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/27

हे पान प्रमाणित केलेले आहे.


खोटा निधर्मवाद आणि दुष्ट राष्ट्रवाद



 भारतीय जनता पार्टी आणि लालकृष्ण अडवाणी मोठ्या विचित्र पेचात सापडले आहेत. १९८४ मध्ये त्यांच्या पक्षाची धूळधाण उडाली. पुऱ्या लोकसभेत फक्त दोन खासदार निवडून आले. पक्षाला देशाच्या राजकारणात पुन्हा स्थान मिळावे यासाठी 'घटम् भिद्यात्, पटम् छिन्द्यात्' एवढेच नव्हे तर अगदी 'रासभरोहण' करून का होईना. येन केन प्रकारेण पन्हा एकदा सत्ता मिळविणे हे त्यांचे उद्दिष्ट राहिले. त्यासाठी आत्यंतिक जातीयवादी संस्थांनी हाती घेतलेले रामाच्या अयोध्या मंदिराचे प्रकरण त्यांनी उचलून धरले. शिलापूजनाच्या कार्यक्रमाने इ.स. १९८९ च्या निवडणुकीत फायदा झाला तर रथयात्रेने इ.स. १९९१ च्या निवडणुकीत भरभराट झाली. लोकसभेत १२३ खासदार निवडून आले भारतातील सर्वांत प्रचंड राज्य उत्तर प्रदेश हाती आले; पण एवढे होऊनही भारतीय जनता पार्टीच्या गोटात वातावरण फारसे आनंदाचे नाही.

 सोळा महिन्यांपूर्वीच ज्या राज्यांत भारतीय जनता पार्टीचे शासन आले त्या राज्यांतच त्यांची पीछेहाट झाली. उत्तर प्रदेशातील सत्ता पुढच्या निवडणुकीत हातात राहीलच याची काहीच खातरी नाही. ज्या राममंदिराच्या नावाने गदारोळ माजवला ते राममंदिर बाबरी मशिदीच्या जागीच बांधणे हे काही केंद्र शासन हाती आल्याशिवाय शक्य नाही. अयोध्येतील कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी भाजपावर; पण बाबरी मशिदीला धक्का लावल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची निश्चिती आणि स्वतःच उभी केलेली आणि उत्तेजन दिलेली विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, शिवसेना अशी भुतावळ थयथयाट करीत असलेली! प्रसिद्ध पुरुष होण्यासाठी गाढवावर बसणे सोपे आहे; पण एखाद्या हिंस्र श्वापदावर आरूढ झाले तर मांड ठेवावी तरी पंचाईत आणि उतरू पहावे तरी जीवाशी गाठ अशा परिस्थितीत भाजपाची मंडळी सापडली आहेत. निवडणुकीतील यशानंतर

भारतासाठी । २७