पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/290

हे पान प्रमाणित केलेले आहे.

आरडाओरड करतात. आणि, नक्षलवादी म्हणजे तर, बोलून चालून, गरिबांचे कैवारी!

 १९९८ सालच्या जनसंसदेमध्ये "स्वतंत्र हिंदुस्थानने ५० वर्षांत आर्थिक प्रगती केली नाही, देशाची एक आर्थिक फाळणी झाली, 'भारता'चे शोषण चालू राहिले, सर्व आर्थिक कार्यक्रम आणि नियोजन यांना 'इंडिया'चा मुखवटा मिळाला आणि त्यामुळे देशाची प्रगती झाली नाही" अशी मांडणी झाली होती. त्यानंतर आज, केवळ दहाच वर्षांत परिस्थिती अशी आली आहे की निर्धार्मिक, लोकतांत्रिक प्रजासत्ताकतरी टिकून राहील किंवा नाही याची शंका वाटू लागली आहे.

 सबंध देशामध्ये, हुकमी बहुमत मिळवील असा एकही पक्ष राहिलेला नाही. वेगवेगळ्या राज्यांत वेगळे वेगळे स्थानिक प्रश्न घेऊन, जातीयवादाचा आधार घेऊन आणि लोकांना खूष करणारे कार्यक्रम जाहीर करून स्थानिक पक्ष उभे राहत आहेत. राष्ट्रीय पक्ष काय आणि स्थानिक पक्ष काय - सर्वच पक्ष मतांच्या गठ्यांसाठी जातीयवादाचा वा अल्पसंख्याकवादाचा आश्रय घेत आहेत.

 'साठी बुद्धी नाठी' अशी म्हण आहे. स्वातंत्र्याच्या ६० वर्षांत भारताची पूर्ण दुर्दशा होत आहे आणि येत्या काही काळात जातीयवाद आणि अल्पसंख्याकवाद यांचा बडेजाव चालू राहिला तर देशाचे पुन्हा तुकडे तुकडे होतील आणि त्यातच काही लोक धन्यता मानतील अशी चिन्हे दिसत आहेत.

(२१ ऑगस्ट २००६)

◆◆

भारतासाठी । २९०