पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/301

हे पान प्रमाणित केलेले आहे.

आर्थिक दुर्दशेच्या पार्श्वभूमीवर, खरे म्हटले तर, लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला सज्जड बहुमत मिळावयास हवे होते पण तोपर्यंत राजकीय पक्षांची फुटाफूट आणि राज्यस्तरीय पक्षांचा वाढता प्रभाव यामुळे निवडणुकीत काँग्रेसला सर्वांत मोठा पक्ष एवढेच स्थान मिळाले. काँग्रेस पक्ष पहिल्यांदा आघाडीचे सरकार बनवण्यास तयार झाला.

 पंतप्रधानपदावर राजीव गांधींच्याही आधी दावा सांगणारे प्रणव मुखर्जी, अर्जुन सिंग यांना बाजूला टाकून 'अंगम् गलितम् मुंडम् पलितम्' अशी अवस्था झालेल्या आणि निवृत्तीच्या तयारीने रामटेक येथे जाऊन राहिलेल्या पी. व्ही. नरसिंह राव यांना पंतप्रधानपदासाठी बोलावण्यात आले. काँग्रेस राजवटीत केवळ घराण्यालाच महत्त्व आहे, गुणवत्तेला नाही; त्यामुळे नरसिंह राव बाजूला फेकले गेले होते; पण अनेक शाखात निपुण, प्रभावी लेखक, अनेक भाषा जाणणारा आणि अनेक मंत्रालयातील प्रशासकीय अनुभव असलेला हा कुशल मुत्सद्दी ऐतिहासिक अपघातांच्या कारणाने पंतप्रधानपदावर पोहचू शकला. नेहरू घराण्याबाहेरचा शास्त्रीनंतरचा हा काँग्रेसचा पहिला पंतप्रधान थोड्या दिवसातच लाल बहादूर शास्त्रीसारखीच त्याची गत होईल असे अनेकांना वाटत होते पण झाले वेगळेच. सत्ता ही मोठी शक्तिवर्धक आहे याचा पूर्ण अनुभव नरसिंहरावांना आला. म्हाताऱ्याची प्रकृती सुधारली टुणटुणीत झाली.


(६-२१ सप्टेंबर २००६)

◆◆

भारतासाठी । ३०१