पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/31

हे पान प्रमाणित केलेले आहे.

वाद सुरू झाला वेगवेगळ्या धर्मातील पुरुषांचा! हिंदू धर्ममार्तंड समग्र स्त्रीसमाजाचे कैवारी असल्याचा आव आणून बोलू लागले. संख्याशास्त्रीय सत्य हे आहे, की हिंदू समाजातच व्यापक प्रमाणावर नव्याने लग्न लागून सासरी आलेल्या मुली जाळल्या जातात. सत्य हे आहे की, दर हजारी लोकसंख्येत स्त्रियांचे प्रमाण हिंदू समाजात जितके कमी आहे तितके दुसऱ्या कोणत्याही समाजात नाही. सर्वांत स्त्रीदुष्ट समाज कोणता असेल तर तो हिंदू समाजच आहे.

 मग, अल्पसंख्यचा अनुनय होतो की नाही? होतो. अपरिहार्यपणे होतो. लोकशाहीच्या आणि निवडणुकीच्या गणिताच्या सोयीसाठी अपरिहार्यपणे होतो; पण असा अनुनय मुसलमानांचाच होतो असे नाही. देशमुखांचा होतो, मराठ्यांचा होतो, माळ्यांचा होतो, कोष्टी, साळी बुद्ध - प्रत्येक समाजाचा असा अनुनय होतो. लोकशाहीच्या व्यवस्थेतील ही एक मर्कटप्रवृत्ती आहे, तिच्याकडे थोडे उदारतेने पाहावे, कुचेष्टेने पहावे आणि मामला सोडून द्यावा. हे बुद्धिमंतांना शोभेल. । घटनेतील निधर्मवाद ही काही एक निश्चित बांधीव विचारसरणी नाही. तो एक प्रवास आहे. उद्दिष्ट थोडेफार स्पष्ट आहे; पण वाट मात्र वेडीवाकडी, चढउतारांची आणि सर्व तहेच्या अडचणींनी भरलेली आहे.

 भारतीय राज्यघटनेतील निधर्मवादाच्या या सर्व त्रुटी सर्वमान्य आहेत; पण या त्रुटींबद्दल सहानुभूतीची आवश्यकता आहे; कुचेष्टेची नाही. कारण या मोडक्यातोडक्या का होईना निधर्मवादाला काही पर्याय संभवत नाही. अडवाणी आणि इतर हिंदुत्ववाद्यांना हिंदुत्व हा पर्यायी मार्ग दिसतो. या राष्ट्राचे स्वरूप हिंदू आहे, राष्ट्राची परंपरा आणि इतिहास हिंदुत्वाचा आहे आणि त्यामुळे हिंदू झेंड्याखाली एक सामर्थ्यशाली आणि स्वाभिमानी राष्ट्र उभे राहील अशी त्यांची कल्पना आहे.

 हिंद धर्म हा खरोखर एकसंध धर्म असता आणि इतर धार्मिकांशी सहिष्णतेने वागणारा समाज असता तर हिंदुत्ववाद्यांची ही कल्पना सहज मान्य होऊ शकली असती; पण ही कल्पना मान्य होऊ शकली नाही याचे महत्त्वाचे कारण म्हणजे भगवा झेंडा हा ‘एकमय लोकांचे प्रतीक नाही. खरी अडचण ही आहे.

 हिंदुत्वाचा इतिहास नेमका कोणता? हिंदुत्ववाद्यांच्या दृष्टीने सर्व भारतखंडामध्ये राजेरजवाडे गुण्यागोविंदाने नांदत होते, एकमेकांविषयी सहिष्णुता होती, दूधमधाच्या नद्या वाहत होत्या आणि एकदम वायव्येकडून मुसलमानांचे हल्ले चालू झाले. कत्तली, जाळपोळ, लुटालूट, बलात्कार यांचे जंगली युग चालू झाले ते इंग्रज प्रवेश करीपर्यंत! इंग्रज गेल्यानंतर आता पुन्हा इतिहासात मागे जाऊन प्राचीन

भारतासाठी । ३१