पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/320

हे पान प्रमाणित केलेले आहे.





आतंकवाद्यांचे भारतावर उपकार


 तीन दिवस ५९ तास. फक्त १० आतंकवादी मुंबईत घुसले आणि सगळ्या भारताच्या ताकदीला त्यांनी जबरदस्त आव्हान दिले. या धक्क्यातून देश अजून सावरलेला नाही. आजच (३० नोव्हेंबर २००८) पंतप्रधानांनी सर्व राजकीय पक्षांची एक बैठक दिल्लीत बोलावली आहे. आज हा लेख लिहिताना मी स्वतः पुष्कळसा सावरलो आहे. २६ नोव्हेंबरपासून आतंकवाद्यांची पुढची पायरी काय असले, त्याचा धक्का आपल्याला पोहोचेल काय या भीतीने सारे भारतीय नागरिक वागले आणि जगले; मीही त्यातलाच एक.

 मोठे अरिष्ट टळले असे दिसते. १० पैकी ९ आतंकवादी ठार झाले. जवळपास २०० नागरिक आणि सुरक्षाकर्मी शहीद झाले. ३००वर लोक जखमी झाले. एकट्या ताजमहाल हॉटेलचेच नुकसान ५०० कोटी रुपयांच्या वर गेले आहे असे म्हटले जाते.

 या सगळ्या धक्क्यातून काहीसा सावरून मी, गेल्या तीन दिवसांत काय घडले त्याचा विचार करतो आहे. ८-१० नोव्हेंबर च्या औरंगाबाद अधिवेशनाचे एक महत्त्वाचे सूत्र होते - प्रत्येक संकट एक संधी समोर आणते.

 गेल्या तीन दिवसांत मूठभर आतंकवाद्यांनी साऱ्या भारतीय व्यवस्था आणि समाज उघडा-नागडा करून दाखवला आहे. योग्य वेळी या आतंकवाद्यांचे आभार मानण्याची वेळ येईल - अर्थात, या सगळ्या घटनेतून योग्य निष्कर्ष काढले आणि आवश्यक त्या सुधारणा केल्या तरच.

 भारतीय शासन आणि प्रजाजन या दोघांमध्येही, जे काही झाले त्याच्या प्रकाशात कठोर आत्मपरीक्षण करण्याची शक्ती नाही आणि आवश्यक ती पावले उचलण्याची इच्छाही नाही. साऱ्या समाजाला पक्षघाताचा झटका आला आहे. आणि त्याबरोबर विवेकक्रियाही सुस्तावली आहे.

भारतासाठी । ३२०