पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/34

हे पान प्रमाणित केलेले आहे.


'भारता'च्या मानगुटी नेहरूवादाचे भूत


 २३मे रोजी जवाहरलाल नेहरू यांची पुण्यतिथी देशभर साजरी झाली. नेहरू-गांधी घराण्यातील एकामागोमाग एक तीन पंतप्रधान झाले. त्या तिघांपैकी प्रत्येकाची जयंती आणि पुण्यतिथी असे दोन दिवस पाळले जातात. त्याखेरीज मोतीलाल नेहरू आणि संजय गांधी यांच्या नावेही आकाशवाणी, दूरदर्शन यांवर एक कोणतातरी दिवस पाळला जातोच. म्हणजे, नेहरू-गांधी घराण्यातील व्यक्तींकरिता एकूण आठ दिवस पाळले जातात.
 तीन पंतप्रधानांच्या जन्मदिनी आणि मृत्युदिनी यमुनाकाठच्या त्यांच्या शांति आणि शक्तीस्थलांवर सगळ्या अतिविशिष्ट व्यक्तींची रीघ लागते; राष्ट्रपतींपासून सुरुवात करून ते शेवटी वसंतराव साठ्यांसारख्या माजी मंत्र्यांपर्यंत. पुष्पमाला अर्पण करण्याचा हा कार्यक्रम सर्व बातमीपत्रांत दिवसभर दाखविला, ऐकविला जातो. नंतर कुठेतरी अगदी सात्त्विक स्वरूपाचा भजन इत्यादींचा कार्यक्रम होतो. त्यालाही अतिविशिष्ट मंडळी मोठी आवर्जून उपस्थित राहातात. दिवसभर मोठ्या मोठ्या शहरांत पक्षांतर्फे सभा घेतल्या जातात. त्यांना थोडीफार निष्ठावान आणि पुष्कळशी आशाळभूत मंडळी हजर राहतात. आणि मग या नेत्यांच्या गुणवर्णनाला काही धरबंधच राहात नाही.

 गेल्या २३ मे च्या कार्यक्रमात पंडित नेहरूंच्या स्मृतीवर अशाच स्तुतिसुमनांचा ढीग घालण्यात आला. भारताचा जवाहर, लोकांचे लाडके, स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते, देशाकरिता अमिरी फेकून देऊन वनवास हसत हसत पत्करणारे असे गुणवर्णन सर्वसामान्यपणे सहजच होते; पण त्यापलीकडे, समाजवादी औद्योगीकरणाचे द्रष्टे, भारतीय निधार्मिकतेचे आधारस्तंभ, भारतीय लोकशाही परंपरांचे जनक आणि आंतरराष्ट्रीय क्षेत्रातील तटस्थ राष्ट्रांच्या चळवळीचे अध्व! अशीही त्यांची भलावण मागील वर्षांपेक्षाही अधिक धूमधामीने करण्यात आली.

भारतासाठी । ३४