पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/65

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 आर्थिक हितसंबंधांनी तत्त्वज्ञान ठरते
 'स्वदेशी' का वैश्विकता? यांच्यातील निवड ही काही तात्त्विक, नैतिक आधारांनी होत नाही. प्रत्येक समाजाच्या कालपरिस्थितीनुरूप हितसंबंधांच्या जोपासनेकरता ही निवड होते. व्यापारवादाचा पुरस्कार करणाऱ्या इंग्लंडने खल्या बाजारपेठेचे तत्त्वज्ञान स्वीकारले कारण इंग्लंडचा स्वार्थ बदलला. गांधीयुगात स्वदेशी हा भारतीयांच्या हितसंबंधाचा कार्यक्रम. कारण, इंग्रजी कारखानदारी मालापुढे टिकाव धरेल अशी काही उत्पादक यंत्रणाच आमच्याकडे उरली नव्हती. थोडक्यात, बाजारपेठेत स्पर्धा करण्याची ज्यांची ताकद ते हिरीरीने खुल्या बाजारपेठेचा उद्घोष करतात आणि ज्यांचा माल महागडा आणि गचाळ ते कृत्रिम संरक्षणाच्या भिंतीआड दडू पाहतात.
 कालामागून फरफटणारे शिलेदार
 स्वदेशीची चळवळ होऊन गेली. काही जणांच्या बुद्धीत प्रकाश पडायला वेळ लागतो. अशांची बुद्धी कायम गतकालातच वावरत असते. शिवाजी महाराज गेले. गडकिल्ल्यांचे राजकारण संपले. रणदल्लाखान इतिहासजमा झाले. तरीही इतिहासात रममाण होणारी माणसे अबलख घोड्यावर स्वार होऊन, जिरेटोपचिलखत घालून, तलवारीच्या धारेवर पंचप्राण लावून दिग्विजय करण्याची स्वप्ने पाहत राहातात. अशा शिलेदारांचे मानसपितर जेव्हा लढायांच्या धुमश्चक्रया चालू होत्या तेव्हा घरोघर कुणगीआड लपले होते अथवा सुलतानांपुढे कुर्निसात घालत होते. स्वदेशीच्या कालखंडात विलायतीचा टेंभा मिरविणाऱ्यांचे ध्वज आता एकदम स्वदेशीकरिता फडफडू लागले ही काय गंमत आहे?
 शेतकऱ्याचा गळा घोटणारी 'स्वदेशी'

 आजच्या स्वदेशी चळवळीत शेतकऱ्यांना काहीही स्वारस्य नाही. स्वदेशीची घोषणा म्हणजे परदेशी माल आपल्या देशात येण्यापासून रोखणे एवढेच नाही. इतर देशांतील लोकांचे हात काही केळी खायला जाणार नाहीत. तुम्ही त्यांचा माल येऊ देत नाही तर ते तुमचा माल येऊ देणार नाहीत. अशा छिन्नभिन्न झालेल्या अर्थव्यवस्थेत आज शेतकऱ्यांना काहीही स्वारस्य नाही. पिढ्यान्पिढ्या जमीन वाटत गेली. शेतीवर भांडवली साधने फारशी उभी राहिलीच नाहीत. तरी देखील भारतीय शेतकरी आज परदेशी बाजारपेठेत उतरून स्वतःच्या ताकदीवर उभा राहू शकतो. आंतराष्ट्रीय खुल्या बाजारपेठेत आडवा घातलेला कोणताही अडसर शेतकरीहिताविरोधी आहे. नवीन स्वदेशी आंदोलनाचा उद्गाता शेतकरी नाही हे नक्की.

भारतासाठी । ६५