पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/92

हे पान प्रमाणित केलेले आहे.

पडले? गावाच्या बाहेरील पालांत आणि झोपड्यांत राहणारे लमाण्यांचे तांडे सुरक्षित राहिले. बळी पडले ते 'शेतकरी आर्किटेक्चर'च्या घरात राहाणारे, म्हणजे दगडगोटे काळ्या-पांढऱ्या मातीच्या गारांत घालून ज्यांनी आपले घर उभे केले तेच गाडले गेले. दुष्काळाचे बळी जसे निवडून शेतकरी समाजाचे तसेच धरणीकंपाचे बळीही.
 इंद्रदेव काय आणि धरणीमाता काय, त्यांच्या कोपाचा त्रास फक्त एका विवक्षित समाजालाच होत असेल तर त्याला अस्मानी संकट म्हणणे खोटेपणाचे आहे. या संकटाची तोशीस आपल्याला फारशी लागू नये याकरिता बाकीच्या साऱ्या समाजांनी काहीना काही तरतूद केली आहे. घसरणीला लागलेला शेतीचा धंदा सावरता सावरता नाकीनऊ आलेल्या शेतकऱ्यांना अशी काही तरतूद करता येत नाही. अगदी सुबत्तेच्या वर्षातही धान्याधुन्याची कणगी भरता येत नाही. मग घरशेतीची डागडुजी दूरच राहिली. प्रत्येक संकटांचे बळी तेच होतात ते याच कारणाने.
 सगळ्या समाजाचा जत्था जंगलातून चालला आहे. जत्थ्याच्या मध्यभागी पुढारी, नोकरदार, कारखानदार इत्यादी भाग्यवान वर्ग आणि जत्थ्याच्या चारी बाजूस जाड थर शेतकरी माणसांचा. जंगलात लांडग्या-कोल्ह्यांची धाड आली तर लचके तोडले जाणार ते शेतकरी समाजाचेच. मध्यभागीचे भाग्यवान सुरक्षित! अशी ही व्यवस्था आहे. अमरावती जिल्ह्यातील कुपोषणाचे बळी काय आणि लातूर-उस्मानाबादचे भूकंप बळी काय दोन्हीही अर्थव्यवस्थेने केलेल्या कत्तलीच आहेत.
 गरिबीचे मोजमाप
 गरिबी हटवायची घोषणा 'फॅशनेबल' झाल्यापासून गरीब म्हणजे नेमके कोण, त्यांची व्याख्या करण्याकरिता कोट्यवधी रुपये, कागद-शाई आणि अर्थशास्त्रांचे श्रम खर्ची पडले आहेत. गरीब कोण तर ज्यांचे उत्पन्न अमुक अमुक रुपयांपेक्षा कमी आहे ते. किंवा ज्यांच्या आहारात उष्मांक किंवा प्रथिने यांचे प्रमाण एका मयादेपेक्षा कमी असते ते. अशा धर्तीच्या व्याख्या विद्वान शास्त्रज्ञांनी दिल्या. आपापल्या व्याख्येच्या समर्थनासाठी ते अभिनिवेशाने झुंजले आणि विद्वान म्हणून मान्यता पावले.
 खरी कसोटी अपघाताची

 खाण्यापिण्याच्या आधाराने जीवनस्तर ठरवणे कोंबड्यांच्याच बाबतीत किंवा दुभत्या जनावरांच्या बाबतीत कदाचित योग्य असेल; मला त्याबद्दलही शंका

भारतासाठी । ९२