पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/96

हे पान प्रमाणित केलेले आहे.

हे स्पष्ट होते. रेल्वेची मर्मस्थाने निवडून नष्ट करण्यात आली. आणखी हे सारे प्रकार लष्करीदृष्ट्या प्रदेशात आणि केंद्रात घडले. यात कोळशाचे उत्पादन आणि पुरवठा करणाऱ्या प्रदेशांचा अंतर्भाव आहे. कोळशाचा पुरवठा थांबला तर त्यामुळे सारी वाहतूक, कारखानदारी आणि व्यापार थंडावला असता. शिवाय हा प्रदेश जपानी हल्ला होण्याची शक्यता असलेल्या प्रदेशाच्या लगत होता. देशांचे संरक्षण करणाऱ्या लष्कराची संचारव्यवस्था उद्ध्वस्त करण्यासाठी यापेक्षा जास्त प्रभावी मर्मस्थाने शोधणे कठीण होते. याउलट आसाम, ओरिसा, पंजाब आणि वायव्य सरहद्द प्रांत येथे कोणतीही गडबड झाली नाही हे लक्षात ठेवण्यासारखे आहे. घातपाताचे सर्व प्रकार मोठ्या धोरणाने आणि हिशेबीपणाने निवडक मर्मकेंद्रावर झालेले हल्ले होते, संतप्त जमावांची विस्कळीत प्रतिक्रिया नव्हती.
  'करू वा मरू'चा आदेश कोणाचा?
 इ. स. १९४२ च्या चळवळीतील सगळ्या ज्वलंत अशा या प्रकरणाला इंग्रज सरकारने घातपाताचे प्रकार म्हटले. भारतीय जनतेच्या दृष्टीने हीच ऑगस्ट क्रांती होती. हे क्रांतिकारी उठाव घडवून आणले कोणी? इंग्रज सरकारचे म्हणणे की, जबाबदारी खुद्द गांधींची आणि काँग्रेसची आहे; पण या क्रांतिकारी घटनांचे पितृत्व 'विश्वामित्रा'च्या थाटात काँग्रेसने आजपर्यंत नाकारले होते. क्रांतिनंतर ५० वर्षांनी का होईना पण सगळ्या घातपाताच्या क्रांतीकारी घटनांना काँग्रेस पक्षाने अधिकृतरीत्या जवळ केले.
 १९४२ साली जे काही घडले त्याचा इतिहास रोमहर्षकही आहे आणि मनोरंजकही.

 दुसऱ्या महायुद्धाचे वादळ
 १९४१ च्या शेवटापर्यंत दुसऱ्या महायुद्धाची परिस्थिती दोस्त राष्ट्रांच्या दृष्टीने मोठी कठीण झाली होती. नाझी फौजा मॉस्कोच्या दरवाजावर धडका देत होत्या तर जपानी फौजा चीन, मलाया, ब्रह्मदेश एकामागोमाग एक झपाट्याने पादाक्रांत करीत चालल्या होत्या. ६ एप्रिल १९४२ रोजी हिंदुस्थानातील विशाखापट्टणम आणि जवळपासच्या बंदरावर जपानी बाँबहल्ले झाले आणि हिंदुस्थानच्या सरहद्दीवर जपानी फौजा कधी येऊन धडकतील ते सांगता येत नाही अशी परिस्थिती दिसू लागली. जपानच्या मुसंडीसमोर ब्रिटिश फौजा मलाया, अंदमान, ब्रह्मदेश अशा एक एक देशांतून माघार घेत होत्या आणि थोड्याच दिवसांत इंग्रज हिंदुस्थानातूनही पाय काढता घेतील आणि सगळा देश जपानी टाचेखाली जाईल याची काँग्रेस

भारतासाठी । ९६