पान:'हरिभाऊं'चे साप्ताहिक करमणूक.pdf/12

हे पान प्रमाणित केलेले आहे.
करमणूक : वाङ्म़यीन अभ्यास
 

'मनोरंजन आणि निबंध चंद्रिका', 'करमणूक', 'सुधारक ज्ञानप्रकाश' इत्यादि नियतकालिकांचे संपादन कार्य केले. कथा, कविता, कादंबरी, चरित्र, नाटक, निबंध, बालवाङ्म़य, भाषा, वाङ्म़य विचार इत्यादी प्रकारांवर वैविध्यपूर्ण बहुगुणी लेखन केले. मराठी ललित व मनोरंजनाच्या साहित्य निर्मितीत हरिभाऊंच्या संपादकत्वामुळेच करमणूक नियतकालिकाला फार मोठे श्रेय द्यावे लागते. वाङ्म़यीन दृष्टी असलेले संपादक स्वतःच्या कादंबरी आणि कथामालेने अंक संग्राह्य व आकर्षित करू शकतात याचा निर्वाळा 'करमणूक' देते.

 ८ मार्च, १८६४ ला 'पारोळे' या खानदेशातील गावी जन्मलेल्या हरिभाऊंच्या कार्याचा उचित गौरव डॉ. ल. म. भिंगारे यांनी त्यांच्या हरिभाऊ या ग्रंथात केला आहे. तो मुळाबरहुकम पाहणे उचित ठरेल. ते म्हणतात, 'ज्या काळात पदवीधर नसणे आणि असणे यामध्ये सर्व सार्वजनिक व वैयक्तिक हालचालींच्या दृष्टीने फार मोठा भेद होता. ज्याकाळी धार्मिक व विवेचक, राजकीय व सामाजिक विचारसरणी मधील झगडे इतके तीव्र होते की, वर्तमान पत्रे ही केवळ स्वमत समर्थनाची व परमत खंडनाची तीव्र धारदार हत्यारे, प्रचारपत्रेच होती. त्याकाळी हरिभाऊंसारख्या पदवी नसलेल्या. मनुष्याने राजकीय, सामाजिक वादग्रस्तेचा उघड वासही न लागलेले 'करमणूक' सारखे साप्ताहिक सतत २८ वर्षे अनेक संकटांशी टक्कर देऊन मुख्यतः स्वतःच्या एकट्याच्याच लेखन सामर्थ्यावर विसंबून आणि कथा, कादंबरी, कविता-चरित्र इत्यादी केवळ ललित साहित्यास्तव चालवून दाखवावे हे अतिशय मोठे काम होय.

 तथापि हाही भाग 'धंद्यातील अधिक उण्या कर्तबगारीचा व सतत कामसूपणाचा म्हणून दुर्लक्षिता येईल. परंतु कथा रचनेचे एकदा व्रत घेतल्यानंतर सुमारे ३५ वर्षांच्या काळात जीवनात जी अनेक अवस्थांतरे यावयाची ती येत असताना स्वतःची लेखणी जुनाटही ठरू द्यावयाची नाही आणि प्रवाहपतीतही होऊ द्यावयाची नाही. साऱ्याच साहित्यकृती सारख्याच उत्कृष्ठ वठणे अशक्यप्राय असले तरी कोणतीही वृत्ती ठराविक दर्जाच्या खाली येऊ द्यावयाची नाही. आणि एकदा आपले मिळविलेले स्थान सतत उच्च राखावयाचे, ही हरिभाऊंची साहित्य क्षेत्रातील मोठी कर्तबगारी आहे, शब्द सृष्टीतील ही चातुरी कोणत्याही क्षेत्रातील कर्तबगारीपेक्षा उणी मानण्याचे तर कारणच नाही. पण उलटपक्षी साहित्य हे युगानुयुगे चिकित्सा विषय राहणार असल्यामुळे त्या चिकित्सेत टिकणारी ही चातुरी अधिक कौतुकास्पद ठरते.