पान:'हरिभाऊं'चे साप्ताहिक करमणूक.pdf/13

हे पान प्रमाणित केलेले आहे.
१०
करमणूक : वाङ्म़यीन अभ्यास
 

 हरिभाऊ हे स्वत: नेमस्त राजकारणी व प्रख्यात कादंबरीकार होते. 'ज्ञानप्रकाश' व 'सुधारका'शी त्यांचा साक्षात संबंध आला. राजकारणी मतप्रचारकापेक्षा त्यांचा पिंड ललित लेखकाचा होता. हरिभाऊंनीच जीवन आणि वाङ्मय यातील अतूट संबंध प्रथम संपूर्णत्वाने जाणला. म्हणूनच ते मराठी कादंबरीला तिचे स्वत्व देऊ शकले आणि पुढील नव्या लेखकांना नवी दिशा देऊ शकले. या हरिभाऊंच्या व्यक्तिमत्वाचे आणि त्यांच्या साहित्याचे साकल्याने घडणारे दर्शन म्हणजेच 'करमणूक' पत्र होय.

 १८८३ मध्ये विष्णूशास्त्री चिपळूणकरांच्या चाहत्यांनी निबंध चंद्रिका हे नियतकालिक मासिक काढले, त्यातही हरिभाऊंचे सहकार्य होते. तर ऐन वीशीत असताना सन १८८६ साली सुरू झालेल्या कानेटकर आणि मंडळींच्या 'मनोरंजन' मासिकाच्या संपादकाची धुरा हरिभाऊंनीच सांभाळली होती. 'नाट्यकथा पर्वाचे' शंकर मोरो रानडे हे हरिभाऊचे मार्गदर्शक होते. 'मनोरंजन' नावाप्रमाणेच त्यातही त्यांनी मनोरंजनावरच भर दिला. मनोरंजनाचा उद्देश, त्यात येणारे विषय शिक्षणाचा मुख्य उद्देश धरून जितके मनोरंजक व प्रतिष्ठित करता येतील, तितके करण्याचा आमचा विचार आहे असाच होता, व मनोरंजन व निबंधचंद्रिका' या संयुक्त मासिकाचे ते १८८७-९२ या ५ वर्षे कालावधीत ते संपादक होते. एवढेच नव्हे तर १८८८ ते १८९४ या सहा वर्षात ज्ञानप्रकाशच्या इंग्रजी विभागाचे संपादन त्यांनी केले. सहृदयता सहानुभूती आणि करूणा यांची मानवाला पडणारी साद घ्यावी आणि द्यावी असा हरिभाऊंच्या कलावंताचा पिंड होता. नामदार गोपाळ कृष्ण गोखल्यांचे स्नेही म्हणून हरिभाऊंना ज्ञानप्रसार ही गोष्ट पवित्र आणि आवश्यक वाटत होती. हरिभाऊंची भूमिका उपयुक्ततावादी सुधारकाची किंवा निर्भेळ उद्धारक राष्ट्रवाद्याची नव्हती, तर ती सहृदय मानवतावाद्याची होती, त्या दृष्टीने त्यांना आगरकर आणि टिळकांपेक्षा नामदार गोखले अधिक जवळचे वाटत होते. हरि नारायण यांची 'करमणूक' चे संपादक म्हणून साहित्यिकावर संस्कार करण्याची व त्यांना घडविण्याची दृष्टी विशद करणारी एक घटना 'विश्रब्ध-शारदेत' नमूद केलेली लक्षात घेतल्यास त्यांची पुरती कल्पना येऊ शकेल.

 नागपूरचे प्रसिद्ध कवी आनंदराव कृष्णाजी टेकाडे यांना त्यांच्या, काव्यलेखनाच्या प्रारंभीच्या काळात ह. ना. आपटे यांनी 'करमणूक' चे संपादक या नात्याने लिहिलेले पत्र, होतकरू कवींना सांभाळून घेऊन व मार्गदर्शन करून त्यांना प्रोत्साहन देण्याची प्रवृत्ती उलगडून दाखविणारे आहे. ते पत्रच मुळातून अभ्यासण्याजोगे आहे.