पान:'हरिभाऊं'चे साप्ताहिक करमणूक.pdf/24

हे पान प्रमाणित केलेले आहे.
करमणूक : वाङ्म़यीन अभ्यास
२१
 

हरिभाऊंवर कलावंत हरिभाऊंनी मात केली हेच खरे. जीवनाभिमुख राहून समाज जीवनाविषयी सतत कुतूहल बाळगल्यामुळे हरिभाऊंच्या करमणूकने दिलेल्या कादंबरीला जिवंतपणाच्या स्पंदनाचा स्पर्श झालेला आहे. यादृष्टीने कुरुंदकर देतात तो 'पहिल्या संवेदनाक्षम कादंबरीकाराचा मान हरिभाऊंचा आहे. रंजक बोधाकडून मराठी कादंबरीला त्यांनी स्वाभाविक जिवंत प्रत्ययकारीत्वाकडे आणले. मराठी कादंबरीच्या विकासाचे नवे दालन करमणुकीतच खुले झाले.

 हरिभाऊंच्या करमणुकीतून क्रमशः प्रसिद्ध झालेल्या महत्वपूर्ण कादंबऱ्या व त्यांचा कालखंड पुढीलप्रमाणे आहे.

 पण लक्षात कोण घेतो (१८९०-९३).
 यशवंतराव खरे (१८९२-९५).
 मी (१८९३-९५).
 जग हे असे आहे (१८९७-९९).
 भयंकर दिव्य (१९०१-१९०३).
 मायेचा बाजार (१९१०-१९१२).

 झोला, डयूमस या फ्रेंच लेखकांच्या कादंब-या हरिभाऊंना फ्रेंच अवगत असल्याने त्यांनी वाचलेल्या होत्या. बेकम, मील, स्पेंसरही त्यांनी वाचलेला होता. मीलचे ' सब्जेक्शन ऑफ विमेन'. त्यांनी उल्लेखिले आहे.

 करमणूक साप्ताहिकातून कादंब-यांच्या क्रमशः प्रसिद्ध होण्याने पाल्हाळिकपणा, विस्कळितपणा, रेखीवपणाचा अभाव, सूत्रबद्धतेचा अभाव, संदिग्धत्ता इत्यादी काही दोषही निर्माण झालेले नाकारता येत नाहीत. गरजेनुसार उत्स्फूर्तही लेखन संपादकाला करावे लागते, हरिभाऊही त्याला अपवाद नाहीत.

 'पण लक्षात कोण घेतो', 'मी' या कादंबऱ्यांनी मराठीत आत्मचरित्रपर कादंबरी हा नवा प्रकार रुजविला. त्याचे आगळे कौशल्य हरिभाऊंनी चरित्र लेखकाच्या कल्पित भूमिकेशी समरस होऊन स्वतःचे व्यक्तित्व विसरून दाखविले.

 मराठीतील 'स्कॉट' ही उपाधी शोभून दिसेल अशा हरिभाऊंच्या ऐतिहासिक कादंबऱ्याही करमणुकीतून इ. स. १८९० ते १९१५ च्या दरम्यान क्रमशः पुढीलप्रमाणे प्रसिद्ध झाल्या.

 म्हैसूरचा वाघ  (१८९०-९१)
 उषःकाल (१८९५-९७)
 केवळ स्वराज्यासाठी (१८९८-९९)
 रुपनगरची राजकन्या (१९००-०३)