पान:'हरिभाऊं'चे साप्ताहिक करमणूक.pdf/34

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
करमणूक : वाङ्मयीन अभ्यास
३१
 

केसांची वाढ सुधारते काय? असे असंख्य विषय आलेले आहेत. आजही महत्त्वाचे हे शास्त्रीय विवेचन ठरू शकेल असेच आहे.

 'रानबदके खारे पाणी पितात, पण त्यांना स्नानाला ते पाणी चालत नाही. पक्षी 'धुळीत, पाण्यात अर्धांग वा सर्वांग बुडवून स्नान करतात, तर काही पक्षी राखेत तर काही ओल्या मातीत स्नान करतात, असे हे मौलिक चिंतन आहे. असेच आणखीही काही विषय. उल्लेखिता येतील. करमणूकच्या ३ मार्च, १९०६ च्या अंकात 'युरोपातील फुलांची' भाषा दिलेली आहे. ती अशी, बाभूळ = गुप्तप्रेम, झेंडू = हलकट मन, शेवंती = आपत्काळी आनंदवृत्ती, तांबडी शेवंती = प्रेम, पांढरी शेवंती = सत्य, अंजीर = वादविवाद, गुलाब = सद्ग़ुण, जास्वंद = सौंदर्य, मोतिया = मी तुजवर प्रेम करतो, सूर्यफल = पूज्यबुद्धी त्यानंतर टीप दिली आहे की 'साहेब लोकासं त्यात मुख्यत्वे मॅडम लोकास फुलांची भेट पाठवतांना सावधपणा राहावा हा हेतू आहे.'

 ३१ मार्च १९०६ च्या अंकात स्त्री पुरुषांची तुलनाही लक्षवेधी आहे.

पुरुष = शक्तिमान, कर्तृत्व, धाडसी, विश्वासपूर्ण, कीर्ती, भाषण खात्रीपूर्वक, कठिण-हृदय, संकट टाळणारा, व्यवहार पाहणारा, न्यायी, शास्त्र अवगत तर,
स्त्री = सौंदर्यवती, सोशिक, शालीन, विनयशील, घर सजविणारी, भाषण मन वितळविते, नाजुक संकटातील दुःख हलके करते, न्याय अन्याय, ज्ञान कमी, क्षमाशील, रसिकता अवगत असते हे वेगळेपण सांगितलेले आहे.

समारोप-

 इंग्रज शासनाकडून साहित्य निर्मितीला कोणत्याही प्रकारचे साहाय्य नसतांना, किंबहुना काही वेळा विरोध झालेला असताना खाजगी प्रयत्नांनी चालविण्यात येणाऱ्या नियतकालिकांनी फार मोठी कामगिरी बजावली व साहित्य निर्मितीला फार मोठा हातभार लावला असे म्हणता येईल. हरि नारायण आपटे यांच्या 'करमणूक' सारख्या साप्ताहिकाने देखील एक साप्ताहिक पत्र असूनही चिरस्थायी वाङ्म़य मराठीमध्ये निर्माण केले आहे.

 करमणुकीसारखे साप्ताहिक ललित वाङमय निर्मितीच्या प्रतिज्ञेनेच सुरू झाले आणि चालविले गले होते. त्यातून हरिभाऊ आपटे यांचे समृद्ध कादंबरी आणि कथा वाङ्म़य प्रथम प्रसिद्ध झाले होते. करमणुकीमुळे स्फुट मराठी कविताही नव्याने प्रकाशात आली. करमणूकसारख्या नियतकालिकाने मराठी दर्जेदार साहित्य निर्मितीस आणि प्रसिद्धीस जे बहुमोल साहाय्य केले, त्यामुळे इ. स. १८९० ते १९१७ या कालखंडातील मराठी साहित्य समृद्ध झाले असे म्हणता येईल.

 'करमणूक'ने अकबर ते अभिमन्यूपर्यंत कोणताच विषय कधी वर्ज्य मानला नाही. जसे त्यात अकबराचे काही नीतीनियम आले आहेत तशीच रणांगणात आसन्नमरण होऊन पडलेल्या अभिमन्यूचेही उद्ग़ार आहेत.