हे पान प्रमाणित केलेले आहे.

 शेतकरी झाल्यानंतर शेतीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. महाविद्यालयातून शिकलेल्या अर्थशास्त्रातल्या सिद्धांतांचे वास्तवाशी काहीच जुळेना. थातुरमातुर अभ्यास केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांची सहज प्रवृत्ती अशी होते, की आपण शिकलो ते खोटे असे कबूल करण्यापेक्षा आपला अनुभव खोटा, शेती खोटी असे मान्य करून टाकावे. शेतकऱ्याच्या, पदवी पदरात पाडून घेतलेल्या मुलाला ती पदवी एवढेच अभिमानस्थान असते; त्याला धब्बा लागू देण्यापेक्षा साऱ्या शेतीच्या इमानाला कलंक लावायला तो मागेपुढे पाहत नाही.शेतकऱ्यांची अनेक पदवीधर मुले राजकारणात पुढे आली. शेती तोट्याचा व्यवसाय असल्याचा अनुभव घेतला आणि तरीही, शेतकरीच अडाणी आहे, आळशी आहे, व्यसनी आहे, खर्चिक आहे असले सिद्धांत मानले. पढिक अर्थशास्त्र खोटे आहे असे छातीवर हात ठेवून सांगण्याची त्यांची हिंमत झाली नाही कारण अर्थशास्त्राच्या अभ्यासाविषयीचा आत्मविश्वास तितकाच लुळापांगळा.

 अभ्यासक्रम संपल्यानंतर सिडनेहॅम कॉलेजमध्येच व्याख्याता म्हणून नेमणूक झाली. माझे एक प्राध्यापक मित्र कोल्हापूरला वाणिज्य महाविद्यालय स्थापन करत होते. त्यांच्या मदतीला जाण्यासाठी भावुकपणाच्या भरात मी कोल्हापूरला जायचे ठरवले. संस्कृतचा अभ्यास सोडून देण्याच्या तिरमिरीत घेतलेल्या निर्णयाइतकाचा हा निर्णयही सगळे आयुष्य बदलून टाकणारा ठरला.


 त्या काळी प्राध्यापकांचे पगार फार बेताबेताचे होते. म्हणून मी नोकरी सोडून प्रशासकीय सेवेत गेलो. संयुक्त राष्ट्रसंघात गेलो. हा सारा इतिहास बहुतेकांना माहीत आहेच. मधल्या काळात समाजवादी व्यवस्था होती. लायसन्स परमिटची व्यवस्था चालवायला प्रत्यक्ष पानाची गादी चालवण्याचा अनुभवही नसलेले प्राध्यापक अर्थतज्ज्ञ म्हणून मान्यता मिळवून गेले. खुल्या बाजारपेठेचे धोरण आल्यानंतर अर्थशास्त्राची पोपटपंची करणाऱ्या साऱ्या प्राध्यापकांचे धाबे दणाणले आहे. गेल्याच आठवड्यातला माझा अनुभव- मुंबईच्या एका कला आणि वाणिज्य महाविद्यालयात भाषण देण्याचा योग आला. विद्यार्थ्यांनी मांडलेल्या प्रदर्शनात शेतीसंबंधी संघटनापूर्व शेतकरीद्वेष्टी विचारसरणी आग्रहाने मांडली होती. शेतकरी विद्यार्थ्याला उद्देशून मी लिहिलेले एक पत्र खूप गाजले. त्याच आधाराने भाषण केले. कोणताही ग्रंथ सर्वप्रमाण मानू नका. कोणीही गुरू अनंतकाळ पुरणारा नाही. शेतकरी आईबापांच्या आयुष्यात सुखाचा एकही दिवस उजाडत नाही, असे कोणते पाप त्यांनी केले?' या प्रश्नाचे उत्तर देईल ती विद्या, बाकी

अंगारमळा । ५४