पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/१२१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

देवळाशेजारी गाणी वा पोवाडे म्हणू लागत. थोडेफार लोक जमले, की जोशी बोलायला सुरुवात करत. शेतकऱ्यांच्या समस्या कुठल्या आहेत, त्यावर काय इलाज करता येईल वगैरे विचार मांडत. एक अनाकलनीय ऊर्जा जणू या कामासाठी त्यांना प्रवृत्त करत असावी. शेतीमालाचा उत्पादनखर्च कसा काढायचा, ह्या पहिल्या धड्यापासून सुरुवात करून आंतरराष्ट्रीय घडामोडींचा शेतकऱ्यावर काय परिणाम राहील इथपर्यंत अनेक मूलभूत मुद्दे ते मांडत. अगदी सोप्या भाषेत बोलत."

 पण अशा फिरण्यालाही अंत होता. अख्खा जन्म जरी असे फिरण्यात घालवला तरी हजारभर शेतकऱ्यांच्या पलीकडे आपण पोचू शकणार नाही हे उघड होते. काय करावे याचा विचार करत असतानाच संघटनेचे एक साप्ताहिक काढावे ही कल्पना पुढे आली. त्याचबरोबर साप्ताहिकाचे नाव काय ठेवायचे, ते रजिस्टर कुठून करून घ्यायचे, साप्ताहिकासाठी कुठून कुठून परवाने घ्यावे लागतात, टपालखात्याची परवानगी कशी मिळवायची, प्रत्यक्ष छपाई कोण करणार, कागद कुठून मिळवायचा, एकूण खर्च किती येतो वगैरे अनेक प्रश्न उभे राहिले. ही साधारण ऑक्टोबर १९७९मधली गोष्ट आहे.
 अशा वेळी बाबूलाल परदेशी मोठ्या धडाडीने पुढे झाले. ते वारकरी पंथाचे होते व कीर्तनेही करायचे. ते म्हणाले,
 "मला स्वतःला भक्तिमार्गाचा प्रचार करण्यासाठी एक साप्ताहिक काढायचं आहे व त्यासाठी मी वारकरी हे नाव दिल्लीहून मंजूर करून घेतलं आहे. तुम्ही म्हणालात तर तेच आपण संघटनेचं मुखपत्र म्हणून सुरू करू शकतो. माझा स्वतःचा छापखाना आहे. मनात आणलं तर दोन-तीन आठवड्यातच आपण ते सुरू करू शकू."
 सुरुवातीला जोशींना ह्या प्रस्तावाबद्दल जरा साशंकता होती. मुख्यतः नावाबद्दल. त्यांच्या मनातील लढाऊ अशा शेतकरी संघटनेचे मुखपत्र म्हणायचे आणि नाव मात्र वारकरी, हे खूप विसंगत वाटत होते. पण दुसरे कुठले नाव मंजूर करून घायचे म्हणजे त्यात पाच-सहा महिने सहज जाणार होते. तेवढा वेळ आता त्यांच्यापाशी नव्हता. भामनेरच्या रस्त्यासाठी एक मोठे आंदोलन उभारायचा गेले काही महिने ते प्रयत्न करत होते. फेब्रुवारी महिन्यात सुरू होणाऱ्या पुढच्या हंगामात कांदाप्रश्नही पुन्हा एकदा भडकणार हे उघड दिसत होते. आता अधिक न थांबता आहे ते वारकरी नाव घेऊनच साप्ताहिक काढणे श्रेयस्कर होते. त्यानुसार मग त्यांनी साप्ताहिकाची कसून तयारी सुरू केली. कुणाचीतरी ओळख काढून पुण्यातील एका दैनिकाकडून कागद मिळवला, मजकूर तयार केला आणि लवकरच वारकरीचा पहिला अंक छापून तयार झाला. तो शनिवार होता व अंकावरची तारीख होती ३ नोव्हेंबर १९७९.

 पहिल्या अंकाच्या पहिल्या पानावर संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांचे चित्र छापले होते. खालच्या भागात संत रामदासांचे चित्रही आहे. कारण या तिघांचे ब्लॉक्स छापखान्यात तयारच होते! 'ओम नमो जी आद्या' या ज्ञानेश्वरीतील पहिल्या ओवीच्या आधाराने जोशींनी पहिले संपादकीय लिहिले. “देश नासला नासला, उठे तोच कुटी, पिके होताची होताची, होते

चाकणचा कांदेबाजार : पहिली ठिणगी१२१