पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/१५२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मी समोर प्रेक्षकांत बसून एकाग्रतेने तल्लीन होऊन ऐकत होतो. त्यांनी शेतकरी महिलांवर बोलायला सुरुवात केली. मी भान विसरून ऐकत होतो. मला एकाएकी भरून आलं. इतकंच नाही तर अक्षरशः दुःखाश्रू आवरेनासे झाले. कारण साहेब माझ्या आईच्या भोगाचं दुःखच सांगत असल्याचा मला भास होत होता. माझ्या आईने पाठीशी पोर बांधून, डोक्यावर पाटी घेऊन, शेतामातीत व चुलीजवळ कष्टाचे जे कढ सोसले तेच साहेब सांगत होते. जगात सुख काय असतं हे माहीत न होताच आई देवाघरी गेली होती. त्या भाषणाने मी व्याकूळ झालो.

 निरगुडेंनी पाहिलेली संघटनेची ही पहिलीच सभा होती. दुसऱ्या दिवशी नारायणगाव येथे व तिसऱ्या दिवशी मंचर येथे झालेल्या संघटनेच्या सभांनाही जोशी त्यांना बरोबर घेऊन गेले. संघटनेचे काम म्हणजे नेमके काय आहे हे निरगुडेंच्या आता पूर्ण लक्षात आले होते. त्या तीन रात्री त्यांचा मुक्काम चाकणजवळील शंकरराव वाघांच्या मळ्यातील घरी होता. जोशींना फक्त एकदा थोड्या वेळासाठी भेटावे ह्या माफक अपेक्षेने, राहण्याचे काहीही सामान बरोबर न घेता आलेले निरगुडे शेवटी चौथ्या दिवशी निफाडला परतले! त्यांना निरोप द्यायला शंकरराव व जोशी स्वतः एसटी स्टँडवर आले होते. ह्या तीन दिवसांत नाशिकला संघटनेचा कार्यक्रम घेण्याविषयी जोशी त्यांच्याशी चर्चा करत होते. त्याविषयी निरगुडे स्वतः खूपच साशंक होते. कारण आपण खूप छोटे आहोत, आपले कोण ऐकणार, असे त्यांना वाटत होते. तरीही त्यांनी 'आपण नक्की नाशिकला कार्यक्रम करू' असे आश्वासन दिले.

 जोशी यांचे आडाखे अचूक होते; त्यांची पेरणी फुकट गेली नाही. पुढे निरगुडेंनी आंदोलनात महत्त्वाचे योगदान दिले. ते काम करत होते त्या निफाड साखर कारखान्याचे चेअरमन माधवराव बोरास्ते ह्यांची. तसेच. पढे शेतकरी संघटनेत खप प्रभावी नेतत्व दिलेले माधवराव खंडेराव मोरे ह्यांची जोशींबरोबरची पहिली भेट त्यांनीच घडवून आणली. एका अर्थाने ऊस आंदोलनात ते संप्रेरक (catalyst) ठरले. त्यांच्यात एक कलावंतही दडलेला होता. जोशींवर चित्रपट काढायची त्यांची योजना होती व त्यासाठी पटकथाही त्यांनी लिहिली होती. शेतकरी संघटनेचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले.

 पण हा सारा नंतरचा भाग झाला; जोशी यांनी सुरुवातीच्या काळात चाकण परिसरापलीकडे जाऊन माणसे कशी जोडली, त्यासाठी किती कष्ट घेतले, किती विचारपूर्वक नियोजन केले ह्याचे हे एक उदाहरण.

 संघटनेच्या आळंदी येथील शिबिराविषयी इथे लिहायला हवे. कारण शेतकरी संघटनेचे हे पहिलेच शिबिर असल्याने त्याला एक ऐतिहासिक महत्त्व आहे. रविवार, ६ एप्रिल १९८० रोजी सकाळी सुरू झालेले हे शिबिर सोमवार, ७ एप्रिलच्या रात्री संपले. नंतरच्या संघटनेच्या शिबिरांमध्ये बाहेरच्या तज्ज्ञांना फारसे स्थान कधी मिळू शकले नाही; पण हे पहिले शिबिर मात्र त्या बाबतीत वेगळे होते.

१४४अंगारवाटा... शोध शरद जोशींचा