पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/१६२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

असा अमानुष प्रकार कधीच पाहिलेला नाही. हा तर उघड उघड अत्याचार होता. युद्धामध्ये दोन्ही बाजूंच्या सैनिकांच्या हाती शस्त्र असतं. इथे तर सगळा एकतर्फी मामला होता. निःशस्त्र किसान विरुद्ध शस्त्रधारी पोलीस! मुकाट्याने मार खाणं आणि असह्य झालं को गुराढोरांप्रमाणे ओरडत जाव घेऊन सैरावैरा पळणं ह्यापलीकडे शेतकरी दुसरं काय करणार?

सोग्रसच्या बाजूनं आमची जीप येताना पाहून रानोमाळ धावणारे शेतकरी क्षणभर थांबले. जीपमधून शरद जोशी उतरताच, त्यांची निळी पँट आणि पांढरा बुशशर्ट हा ओळखीचा पोशाख नजरेस पडताच, क्षणार्धात सर्व शेतकऱ्यांच्यात नवचैतन्य पसरलं. ह्या एकतर्फी चालू असलेल्या निघृण हल्ल्याच्या समरप्रसंगी एकाएकी आपल्या सेनापतीला पाहून सारा किसान वेदना विसरून गर्जून उठला!

शरद जोशी जीपच्या बॉनेटवर चढून उभे राहिले. पाहता पाहता माळरानावर पाच हजार शेतकरी घोषणा देत जमले. शरद जोशींनी त्यांना शांत राहण्याची सूचना दिली. सारा समुदाय एकदम सावधान झाला आणि कानात प्राण ओतून आपल्या नेत्याचे शब्द ऐकू लागला. लाठ्याकाठ्यांनी बडवली गेलेली, काही क्षणांपूर्वीच गुराढोरांप्रमाणे ओरडणारी, नेत्याला पाहून भान हरपून घोषणा देणारी, पाच हजार माणसं क्षणार्धात शांत झालेली पाहन मी विस्मयचकित झालो. असं विलक्षण नाट्य मी ह्यापूर्वी कधीच पाहिलं नव्हतं किंवा अनुभवलं नव्हतं.

 आंदोलनाच्या काळात शरद जोशींची शेतकऱ्यांवर किती जबरदस्त पकड होती हेही ह्या प्रसंगावरून दिसते.

 आंदोलन चिरडण्यासाठी मारझोड करणे हा तसा पोलिसांचा नेहमीचाच मार्ग, पण ह्यावेळी पोलिसांनी एक वेगळाच मार्गही वापरला. आधी पोलिसांनी नाशिक जिल्ह्यात जिथे जिथे शक्य होते, तिथे तिथे लाठीमार करून सत्याग्रहींना हटवले व रस्त्याचा थोडा थोडा भाग मोकळा केला. त्यासाठी रस्त्यावर झोपलेल्या शेतकऱ्यांवरही त्यांनी जबरी लाठीमार केला. रस्ता बंद असल्यामुळे नाशिक जिल्ह्याच्या बाहेर महामार्गावर वेगवेगळ्या ठिकाणी हजाराहजारांनी गाड्या अडकून पडल्या होत्या. त्या गाड्या पोलिसांनी नाशिक जिल्ह्यात मोकळ्या केलेल्या महामार्गाच्या पट्ट्यांवर आणून उभ्या केल्या. पण पुढे मंगरूळफाट्यावर चाळीस हजार शेतकरी रस्त्यावर बसून होते. इतक्या मोठ्या जमावावर लाठीमार करणे पोलिसांना शक्य नव्हते. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात आणून उभ्या केलेल्या गाड्या तिथेच अडकून पडल्या; त्यांना पुढे जाता येईना.

 अशा प्रकारे अडकून पडलेल्या ट्रक्सच्या ड्रायव्हर्सना पोलिसांनी बाजूला नेऊन चिथवले की 'तुमच्या ह्या गाड्या समोर रस्ता अडवून बसलेल्या शेतकऱ्यांमुळे अडल्या आहेत.

१५४अंगारवाटा... शोध शरद जोशींचा