पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/१६९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

घुमरेंनी याविषयी विस्ताराने लिहिले आहे (पृष्ठ १४६-७) :

आम्ही नाशिकच्या बार असोसिएशनची बैठक घेऊन शेतकरी आंदोलनास पाठिंबा देण्याचा व न्यायालयीन कामात शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करायचा ठराव एकमताने मंजूर केला. मला सांगायला अभिमान वाटतो, की सर्व वकिलांनी शेतकऱ्यांच्या साहाय्यासाठी सक्रिय भाग घेतला. न्यायालयीन कर्मचारीवर्गानेही सर्व मदत केली. न्यायाधीश मंडळींनीसुद्धा पूर्ण सहकार्य देऊ केले. सहीसुद्धा करू न शकणाऱ्या असंख्य शेतकऱ्यांनी वकीलपत्रावर स्वतःचा अंगठा उमटवला. अटक झालेल्या शेतकऱ्यांच्या संख्येमुळे न्यायालयातील जागा अपुरी पडू लागली, म्हणून मी माझ्या वकीलमित्रांना सल्ला दिला, की त्यांनी न्यायाधीशांना तुरुंगात नेऊन तिथेच न्यायालयाचे कामकाज करावे. बऱ्याच न्यायाधीशांनी तसे केले. मी स्वतः नाशिक रोड मध्यवर्ती तुरुंगात जाऊन काही प्रकरणे हाताळली. जाधव नासिक रोडचे पोलीस अभियोक्ते होते. त्यांनी कर्तव्याचा भाग म्हणून शेतकऱ्यांविरुद्ध कामकाज पाहिले. त्यांची पत्नी खेडेगावातून आलेली असल्याने, तिने जामिनावर सुटका झालेल्या शेतकऱ्यांना भोजन देण्याच्या कार्यात सहभाग घेतला. तिचा कामातला उत्साह पाहून मीही आश्चर्यचकित झालो. एरव्ही त्या महिलेला घराबाहेर पडलेले कोणी पाहिले नव्हते. एका अर्थाने खेडेगावातील महिलांमध्ये एक प्रकारचे स्थित्यंतर घडून आले होते.

 अॅड. घुमरे यांनी व एकूणच नाशिकमधील वकिलांनी जे सहकार्य शेतकरी आंदोलकांना दिले, ते भारतातील सामाजिक चळवळीच्या इतिहासात खूप उल्लेखनीय मानले जाईल.

 १४ डिसेंबर १९८० रोजी आंदोलन यशस्वी झाल्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी पिंपळगाव बसवंत येथे शेतकऱ्यांचा प्रचंड मेळावा झाला. एक लाखाहून अधिक शेतकरी मेळाव्याला हजर होते.
 पहिले वक्ते होते माधवराव मोरे. ते म्हणाले,
 “जी किंमत मोजून तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने इथे जमलात, त्याला हिशेब नाही. पण एवढ्यानं भागणार नाही हे ध्यानात ठेवा. आपल्या रामायणातील राम आत्ता कुठं नुसता अयोध्येच्या बाहेर पडला आहे. त्याचा वनवास इथून पुढं सुरू व्हायचा आहे. म्हणून सांगतो, हुरळून जाऊ नका, सावध राहा!"
 नंतर प्रल्हाद कराड पाटील म्हणाले.

 "स्वातंत्र्यानंतर आज प्रथमच शेतकऱ्यांना पक्षविरहित आणि सत्तेची अभिलाषा न बाळगणारं, संपूर्णपणे प्रामाणिक आणि निःस्वार्थी असं नेतृत्व शरद जोशींच्या रूपानं मिळालं आहे. सारा शेतकरी समाज आज त्याच्यामागे उभा आहे, ह्याचं राजकारण्यांना फार मोठं दुःख

उसाचे रणकंदन १६१