पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/१७६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सांगून हवा सूट घेतली जाई. तंबाखू पोत्यांत भरून आणला जाई. त्या पोत्याला बोद म्हणत. एका बोदामध्ये साधारण साठ किलो तंबाखू असायचा. ह्या पोत्याचे वजन एकूण वजनातून वजा केले जाई. त्याला बारदान सूट म्हणत. खूपदा वजन करायचा काटा नीट नाही, म्हणून काटा सूट घेतली जाई. सूट म्हणून नेमके किती वजन कमी पकडायचे ह्याचे काही गणित नव्हते - व्यापारी ठरवेल, तोच आकडा स्वीकारण्यावाचन शेतकऱ्याला गत्यंतरच नसे. सरासरी एक बोद तंबाखूमागे सुमारे दहा किलो सूट म्हणून वजनातून कमी केले जात. म्हणजे शेतकऱ्याचे साधारण एक षष्ठांश किवा १६% नुकसान हे या पहिल्या पायरीतच व्हायचे.
 विक्रीचा कागदोपत्री काहीच पुरावा शेतकऱ्याकडे नसे, व्यापारी आपल्या वहीत लिहन ठेवत तोच हिशेब गृहीत धरला जाई. विक्रीचे पैसेही शेतकऱ्याला लगेच कधी मिळत नसत; त्यासाठी निदान सहा महिने थांबावे लागे आणि चार-पाच चकरा माराव्या लागत. त्याआधी जर शेतकऱ्याला पैसे हवे असतील, तर ते त्याचेच पैसे व्यापारी त्याला व्याजावर देई; म्हणजे शेतकऱ्याला देय असलेल्या व मुळातच खूप तुटपुंज्या असलेल्या रकमेवरही त्यालाच व्याज द्यावे लागे! अर्थात सगळेच व्यापारी तसे होते असे म्हणणे गैर ठरेल; काही व्यापारी सरळ मार्गाने व्यवहार करणारेही असत.
 तंबाखूच्या व्यापाऱ्यांच्या वखारी असत. तंबाखू नीट जमा करून घेणे, तो साठवणे, नंतर ठरलेल्या जागी रवाना करणे वगैरे कामांसाठी ह्या वखारी असत. तिथे मुख्यतः महिला काम करत. तंबाखवर प्रक्रिया करून जर्दा बनवण्याचे कामही महिला कामगारच करत. त्यांची परिस्थिती अतिशय वाईट होती. कोंदट, अपुरी, अस्वच्छ जागा, कामासाठी बसायचीदेखील गैरसोय, तरीही एकाच जागी तासन्तास बसायची सक्ती, सर्वत्र दरवळणारा तंबाखूचा वास, अंगावर अगदी नखशिखान्त जाऊन बसणारा बारीक तंबाखूचा थर. मग्रूर मालक, सकाळी नऊ वाजता महिला कामाला आल्या, की वखारीचा दरवाजा बंद केला जाई. दुपारी दोन वाजता त्यांना अर्धा तास जेवणाची सुट्टी असायची. त्यानंतर पुन्हा कामाला सुरुवात, ते अगदी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत. त्या दरम्यान अगदी देहविधीसाठीदेखील बाहेर पडायची परवानगी नसायची. त्यातून मजुरी अत्यंत कमी. कोणी फार आवाज उठवला तर त्याला सरळ करायला वखारमालकांनी पोसलेले गंडही सज्ज असत.
 निपाणी व आसपासच्या भागात अशा पंधरा-वीस हजार तरी महिला तंबाखू कामगार होत्या. त्याशिवाय प्रत्यक्ष विडी बनवणारे कारखाने असत. आश्चर्य म्हणजे इतकी मोठी कामगारसंख्या असूनही निपाणीत सरकारी लेबर ऑफिस नव्हते. कुठलीही तक्रार करायची म्हटली तर चिकोडी ह्या तालुक्याच्या गावी जावे लागे. तिथे जायचे म्हणजे कामगारांचा त्या दिवसाचा रोजगार बुडायचा. शिवाय, गेल्यावरदेखील तो विशिष्ट ऑफिसर भेटेलच अशी खात्री नसायची. तो नसला तर दुसरे कोणीही कामगारांचे काम करत नसे. त्यामुळे अन्यायाविरुद्ध दाद मागायची तरी कशी आणि कोणापुढे?

 सुभाष जोशी हे निपाणीच्या तंबाखू आंदोलनातील एक प्रमुख व्यक्तिमत्त्व. मध्यम बांधा,

१६८अंगारवाटा... शोध शरद जोशींचा