पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/१७९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तो क्षणही लौकरच आला. नाशिकच्या ऊस आंदोलनावर योद्धा शेतकरी' लिहिणारे विजय परुळकर हे त्यासाठी निमित्त ठरले.
 एका स्वयंसेवी संस्थेच्या विनंतीवरून निपाणीत देवदासींच्या मुलींसाठी एखादे वसतिगृह उभारता येईल का याची पाहणी करण्यासाठी परुळकर इथे आले होते. देवदासींचे हे माहेरघरच. तंबाख कामगार स्त्रियांमध्येही अनेक देवदासी असतात. यल्लम्मा देवीच्या यात्रेला हजारो देवदासी व काही इतर महिलाही इथे देशभरातून येत. वसतिगृह स्थापन करण्यासाठीची आवश्यक ती माहिती त्यांनी तीन-चार दिवसांत मिळवलीदेखील. त्याचदरम्यान सुभाष जोशी त्यांना भेटले व तंबाखूप्रश्नाशी परुळकरांचा परिचय झाला. दोघांमध्ये नाशिकच्या ऊस आंदोलनाबद्दलही बरीच चर्चा झाली. भाई धारियाही तिथे हजर होते. शरद जोशींची कीर्ती त्यांच्यापर्यंत पूर्वीच पोचली होती. त्यांचे नेतृत्व इथल्या मरगळलेल्या शेतकऱ्याला एक नवे चैतन्य देईल हे जाणवले होते, पण शरद जोशींशी त्यांनी पूर्वी कधी थेट असा संपर्कही साधला नव्हता. परुळकरांमुळे आता त्यांना तो मार्ग उपलब्ध झाला. 'निपाणीला या' हे एका जोशींचे आमंत्रण परुळकरांनीच दुसऱ्या जोशींपर्यंत पोचवले.
 त्यानंतर अनेकदा परुळकर निपाणीला आले व इथल्या आंदोलनावर 'रक्तसूट' ह्या नावाने त्यांनी 'माणूस' साप्ताहिकात मे-जून-जुलै १९८१मध्ये एक उत्कृष्ट लेखमाला लिहिली. पण का कोण जाणे, 'योद्धा शेतकरी इतकी ही लेखमाला गाजली नाही आणि पुढे पुस्तकरूपात प्रकाशितही झाली नाही.
 परुळकरांनी आपले काम चोख बजावले. पुण्याला परतताच त्यांनी शरद जोशींची भेट घेतली. सुभाष जोशी आणि गोपीनाथ धारिया ह्यांचे आमंत्रण त्यांच्यापर्यंत पोचवले. तंबाखू कामगार व शेतकरी ह्यांच्या एकूण परिस्थितीबद्दल सगळी माहिती दिली. निपाणीत घेतलेल्या काही मुलाखतींच्या टेप्स ऐकवल्या. परिणामस्वरूप शरद जोशी विजय व सरोजा परुळकर ह्यांच्यासह ३० जानेवारी १९८१ रोजी पुण्याहून निपाणीला आले. लीलाताईंचे काही नातेवाईक बेळगावात राहात, पण यापूर्वी कधी शरद जोशी निपाणीला आले नव्हते.
 आल्या आल्या सगळे सुभाष जोशी ह्यांच्याच घरी गेले. कार्यकर्त्यांची मोठीच गर्दी तिथे उसळली होती. निपाणीत शरद जोशी दाखल झाल्यामुळे सर्वांनाच एकदम नवा उत्साह आला होता. रात्री उशिरापर्यंत सर्वांची चर्चा झाली, काय काय करता येईल याची प्राथमिक आखणीही झाली.

 निपाणीत शरद जोशींची प्रतिमा उजळवणारी एक घटना योगायोगाने त्याच दिवशी घडली. शेतकरी संघटनेच्या नाशिक येथील आंदोलनाला इंग्लंडच्या बीबीसी टेलेव्हिजनने बरेच कव्हरेज दिले होते व शरद जोशींची प्रत्यक्ष मुलाखत घ्यायची त्यांची इच्छा होती. भारतीय शेतकऱ्यांचा अन्यायाविरुद्ध उठाव ही त्यांच्या दृष्टीने खूप मोठी घटना होती. त्या दृष्टीने त्यांनी जोशींशी पुण्यात संपर्कदेखील साधला होता. त्यावेळी बीबीसी टेलेव्हिजनची तीन-चार इंग्रज छायाचित्रणकारांची व पत्रकारांची टीम दिल्लीत आली होती; राजीव गांधी ह्यांची मुलाखत घेण्यासाठी. ती संपवून ही टीम पुण्याला येणार होती. पण जोशी निपाणीत असणार म्हटल्यावर

धुमसता तंबाखू १७१