पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/२९६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 जिची दोन मुले निपाणी गोळीबारात मारली गेली होती, तिच्या सांत्वनासाठी एकदा जोशी गेले असताना ती बहादूर शेतकरी महिला त्यांना निर्धाराने म्हणाली होती, “माझा तिसरा मुलगा असता तर तोही मी आंदोलनासाठी दिला असता."
 शेतकरी संघटनेचे एक नेते रामचंद्रबापू पाटील यांच्या बागलाण येथील घरी एकदा जोशी गेले होते. आदले एक वर्ष रामचंद्रबापूंनी संघटनेचे अध्यक्षपद भूषवले होते. त्याचा संदर्भ देत त्यांच्या पत्नींना जोशी म्हणाले, "वर्षभर तुम्ही संघटनेच्या कामासाठी बापूंना मोकळे सोडले ह्याबद्दल तुमचे आभार कसे मानू?" यावर त्या उत्तरल्या, "साहेब, मुलं लहान आहेत म्हणून, नाहीतर आम्हीपण संघटनेकरता बाहेर पडलो असतो." ही भावना इतरही अनेक महिलांची असायची.
 ज्या महिला काही ना काही घरगुती कारणांनी आंदोलनात सामील होऊ शकत नसत, त्याही अनेकदा म्हणत, "आमचे मालक तुमच्याबरोबर दिवसदिवस काम करतात, घरी आल्यावर त्या सगळ्याचं वर्णन करतात, पण ह्या कामात आमचा सहभाग काही नाही ह्याचं आम्हाला वाईट वाटतं. या कामात आमचं नेमकं स्थान काय?" एकीने तर आपली अशा प्रकारची घुसमट व्यक्त करणाऱ्या आपल्या पत्राच्या शेवटी एक धमकीच दिली होती - "तुम्ही जर का ह्या प्रश्नाला योग्य उत्तर शोधलं नाही, तर मी या जगात फार दिवस राहू शकणार नाही, इतका माझ्या जीवाचा कोंडमारा होत आहे.”
 कार्यकर्त्यांच्या पत्नीची आस समजण्यासारखी होती व म्हणून शक्यतो सर्वच कार्यकर्त्यांनी आपापल्या पत्नीलाही सभेसाठी सोबत आणावे असे जोशी सांगू लागले. सटाणा येथे १९८२मध्ये भरलेल्या शेतकरी संघटनेच्या पहिल्याच अधिवेशनात शेतकरी स्त्रियांच्या प्रश्नांची स्वतंत्र चर्चा ठेवली होती. दिवस होता २ जानेवारी.

 पुढे एकदा सगळ्या श्रोत्यांना हेलावून टाकणाऱ्या आपल्या भाषणात जोशी म्हणाले होते,

शेतकऱ्याच्या घरी मुलगी म्हणून जन्माला येण्यासारखं पाप नाही. पायावर उभी राहायला लागते न लागते, तो एखादं धाकटं भावंडं सांभाळायची जबाबदारी. त्या कोवळ्या वयातही आईनं सांगितलं नाही तरी, तिला मदत करायची जरूर असल्याची जाणीव पोरींना कशी होते, कोणास ठाऊक! पाच, सहा वर्षांची झाली – ज्या वयात शहरातली मुलं थंडीच्या दिवसांत ऊबदार पांघरुणात उशिरापर्यंत शांतपणे झोपून राहतात आणि त्यांना झोपलेलं पाहून त्यांचे आई-बाप बाजूला जोडीनं उभं राहून त्यांचं कौतुक करतात – त्या वयात ही शेतकऱ्याची पोर आईचं नाहीतर बापानं गोधडी उचकटून टाकल्यामुळे डोळे चोळीत चोळीत शेण गोळा करायला धावते. दिवसभर गुरांच्या मागे धाव धाव धावून, संध्याकाळी अंग धुळीने भरलेलं, केस धुळीने माखलेले आणि हातापायावर काट्याफांद्यांचे ओरखडे अशा अवस्थेत पोटाशी पाय घेऊन झोपी जाते.

२८०अंगारवाटा... शोध शरद जोशींचा