पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३२७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 ही परिस्थिती समाजासमोर यावी, म्हणून मुंबईत रविवार, २४ मार्च १९९६ रोजी शेतकरी संघटनेने एक बीजिंगविरोधी महिला परिषदही घेतली. सकाळी शिवाजी पार्कलगतच्या वनिता समाजाच्या सभागृहात नोंदणीकृत सातशे महिला प्रतिनिधींची सभा झाली. तेथील चर्चासत्राचे उद्घाटन शेतकरी महिला आघाडीच्या तत्कालीन अध्यक्षा इंदिरा पाटील यांनी केले. त्यांच्यानंतर माजी आमदार सरोज काशीकर आणि सुमन अगरवाल यांची भाषणे झाली. उत्तरार्धातील चर्चासत्रात वसुंधरा शिंदे, शैलजा देशपांडे, चेतना सिन्हा-गाला, अंजली पातुरकर, कमल देसाई, माया टेमुर्डे, रत्ना अष्टेकर, अरुणा नेवले, रेखा ठाकरे, निर्मला गावंडे वगैरेंनी भाग घेतला. परप्रांतातील महिलांच्या वतीने गुजरातमधील इला पटेल यांनी आपली मते मांडली. बीजिंग येथे घेण्यात आलेल्या निर्णयांना विरोध करणारे चार ठराव प्रतिनिधी सभेने संमत केले. जनता पक्षाचे डॉ. सुब्रमण्यम स्वामी सत्राच्या अध्यक्षस्थानी होते व जोशींच्या भाषणाने खुल्या सत्राची समाप्ती झाली. खुल्या सत्राला सुमारे ३०,००० शेतकरी महिला व पुरुष स्वखर्चाने उपस्थित होते. अधिवेशनासाठी गुजरातमधून पाचशे, मध्यप्रदेशातून शंभर तर उत्तर प्रदेशातून पन्नास महिला हजर होत्या. आश्चर्य म्हणजे आमंत्रण देऊनही महाराष्ट्रातील इतर महिला संघटनांच्या वतीने एकही प्रतिनिधी चर्चासत्रास किंवा नंतरच्या खुल्या सत्राला उपस्थित नव्हता. नही दासी सरकारी, नारी है चिंगारी' अशा घोषणा देत सर्वांनी मैदान सोडले.

 शेतकरी आंदोलनातील महिलांचा सहभाग हा नेहमीच खूप आगळावेगळा राहिला आहे. उदाहरणार्थ, डिसेंबर १९८६च्या सेवाग्राम येथील रेल रोको आंदोलनात पोलिसांना चुकवून रेल्वे रुळांपर्यंत कसे पोचायचे हा एक प्रश्नच होता. मार्गदर्शन करायला कोणीच मोठे नेते उपलब्ध नव्हते; सगळ्यांनाच पोलिसांनी पूर्वीच पकडले होते. अशावेळी शैलजा देशपांडे, अश्विनी सबाने, सुनंदा तुपकर, सरोज काशीकर अशा काही महिला पुढे झाल्या. इतर अनेक महिलांना त्यांनी तयार केले. एरव्ही कधीच साडीशिवाय दुसरा पोशाख न केलेल्या या महिला त्यावेळी चक्क पंजाबी ड्रेस घालून घराबाहेर पडल्या, पोलिसांना गुंगारा देऊन रेल्वे रुळांपर्यंत पाचल्या. रेल्वे रुळांच्या आजूबाजूला किती घाण असते हे सर्वश्रुत आहे. पण त्याची काहीही तमा न बाळगता या महिलांनी स्वतःला रेल्वे रुळांवर झोकून दिले आणि पुढचे तीन तास तसेच आडवे पडून रेल्वे रोको यशस्वी केले. गांधीजींच्या १९३० सालच्या दांडीयात्रेत व नंतरच्या आंदोलनात अनेक सर्वसामान्य नागरिकांचा सहभाग होता. जी मंडळी कधीच कुठल्या आंदोलनात सामील झाली नव्हती, तीही रस्त्यावर उतरली. आपल्या आत्मचरित्रात त्याचे वर्णन करताना पंडित नेहरूंनी म्हटले होते - “Feet of clay caught the spark of life.” ("मातीचे पाय असलेल्या सर्वसामान्य माणसांनाही चैतन्याची ठिणगी स्पर्शून गेली.") शेतकरी संघटनेच्या आंदोलनात उत्स्फूर्तपणे सामील झालेल्या अनेक सामान्य शेतकरी स्त्रीपुरुषांना नेहरूंचे हे शब्द चपखल लागू पडतात.

 भारतात स्त्रीमुक्ती चळवळ अनेकांनी केली व त्यांचे योगदान आपापल्यापरीने महत्त्वाचे आहेच, पण ही चळवळ मुख्यतः शहरी भागापुरती व त्यातही सुशिक्षित, मध्यमवर्गीय

किसानांच्या बाया आम्ही...३११