पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३३५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आंदोलनाचा कार्यक्रम जोशी जाहीर करणार होते. म्हणूनच देशभरातील प्रमुख शेतकरी संघटनांचे कार्यकर्ते या सभेला हजर राहतील यासाठी त्यांनी खास प्रयत्नही केले होते. सार्वत्रिक निवडणुका जवळ आल्या होत्या व आता राष्ट्रव्यापी आंदोलन सुरू केले तर निवडणुकीच्या खिंडीत सरकार बरोबर सापडेल असा त्यांचा कयास होता.
 दुर्दैवाने दुपारी दोनच्या सुमारास टेहेरे गावी ती बातमी पोचली - पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर त्यांच्याच शीख सुरक्षारक्षकांनी गोळ्या झाडल्याची. त्यांच्या निधनाचे वृत्त मात्र त्यावेळी जाहीर करण्यात आले नव्हते; बातमी फक्त 'गोळ्या झाडल्या' एवढीच होती. ठरल्याप्रमाणे अडीच वाजता सभेला सुरुवात झाली. संघटनेचे अध्यक्ष रामचंद्रबापू पाटील यांनी प्रास्ताविक केले. आपल्या भाषणात त्यांनी ह्या हल्ल्याचा तीव्र निषेध केला व पंतप्रधानांच्या प्रकृतीस लौकर आराम पडो अशी प्रार्थनाही केली. वेगवेगळ्या राज्यांतील प्रतिनिधींची भाषणे झाली. शेवटी जोशी स्वतः आपल्या भाषणासाठी उठणार तेवढ्यात इंदिराजींचे निधन झाल्याचे पोलिसांकडून अधिकृतरीत्या कळले. सगळे अगदी सुन्न झाले. आगामी आंदोलनाची घोषणा करण्यात आता काही अर्थच उरणार नव्हता. सगळ्या उपक्रमातील हवाच एकाएकी काढून घेतल्यासारखे झाले. कसेबसे जोशींनी आपले भाषण आटोपते घेतले व सभा संपली.
 शिवाय आता एक तातडीचा गंभीर प्रश्न शेतकरीनेत्यांपुढे उभा राहिला. ह्या सभेला पंजाबमधूनही बारा शीख शेतकरीनेते आले होते. देशभर शिखांविरुद्ध संतापाचे वातावरण तयार झाले असून अनेक ठिकाणी शिखांच्या कत्तलीही सुरू झाल्या आहेत अशाही बातम्या येत होत्या. गेल्या दोन-तीन वर्षांत ह्या शीख नेत्यांनी महाराष्ट्रातील शेतकरीनेत्यांचे अतिशय प्रेमाने आगतस्वागत केले होते. त्यांना आता कसे सांभाळायचे हा प्रश्न होता. 'अटकेपार' या प्रकरणात लिहिल्याप्रमाणे देवकर व बोरावके यांनी त्यांची सगळी देखभाल केली व तो भाग व्यवस्थित पार पडला. पण अपेक्षित ते देशव्यापी आंदोलन जाहीर करायची संधी मात्र हातची निसटली होती.
 पुढल्या तीन आठवड्यांत देशभर राजीव गांधी यांच्याविषयी सहानुभूतीची प्रचंड लाट उसळली. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात देशभर शिखांचे जे शिरकाण झाले त्यानेही ह्या राजीवलाटेला अडथळा निर्माण झाला नाही. राजीवविरोधातले काहीही लोकांना सहन होण्यासारखे नव्हते. आंदोलनाच्या विस्तारात एकाएकी अकल्पित अशी बाधा निर्माण झाली होती. नव्याने कुठले व्यापक आंदोलन छेडण्यात सध्याच्या परिस्थितीत काहीच अर्थ नव्हता. साहजिकच जोशी खूप अस्वस्थ होते.
 लगेचच सार्वत्रिक निवडणुकाही जाहीर झाल्या. राजीव गांधी प्रचंड बहुमताने निवडून येणार ह्यात कोणालाच शंका नव्हती. परंतु प्रचंड बहुमत मिळवून राजीव सत्तेवर आले, की अगदी शिगेला येऊन ठेपलेले शेतकरी आंदोलन मागे पडणार असे जोशींना वाटत होते.

अशावेळी इतर काही नेत्यांच्यासमवेत राष्ट्रीय पर्याय म्हणून एखादी अ-राजकीय आघाडी

राजकारणाच्या पटावर३१९