पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३३८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शब्दांत अनेकवेळा टीका केली आहे. नेहरूंचे पुतळे उखडून टाकावेत असेही त्यांनी म्हटले होते. प्रत्यक्षात कोणी तसे केले नाही हा भाग वेगळा. राजीव गांधींना ते करत असलेला कडवा विरोध त्यांच्या अनेक सहकाऱ्यांनाही पसंत नव्हता. 'आत्ताच बिचाऱ्याची आई गेली आहे. आपण त्याची अशी टिंगल करणे बरोबर नाही, असे माई बोरावके, भास्कररावांच्या पत्नी एकदा म्हणाल्याही. पण जोशींनी आपली भूमिका बदलली नाही. इंदिरा काँग्रेसला त्यांनी 'शत्रू क्रमांक एक' मानले याला ही पार्श्वभूमी होती.
 राज्यातील सर्व ४८ मतदारसंघांतील सर्वांत प्रभावी इंदिरा काँग्रेसविरोधी उमेदवारांची एक यादी संघटनेने प्रसिद्ध केली व सर्व अनुयायांनी त्यांनाच मते द्यावी असे आवाहन केले. परंतु मतदारांवर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. शरद पवार, दत्ता सामंत व मधु दंडवते हे एरवीही खूप प्रबळ असलेले तीन उमेदवार वगळता संघटनेने पुरस्कृत केलेला एकही उमेदवार निवडून आला नाही. उर्वरित सर्व जागा इंदिरा काँग्रेसने जिंकल्या.
 लोकसभेच्या एकूण ५१४ जागांसाठी निवडणुका झाल्या होत्या व त्यातील ७९ टक्के, म्हणजे ४०४, जागा मिळवून राजीव गांधी पंतप्रधान बनले. आंध्रात ३० जागा मिळवणाऱ्या तेलुगु देशमचा अपवाद वगळता सर्व विरोधी पक्षांचा त्यांनी अक्षरशः धुव्वा उडवला. 'प्रथमग्रासे मक्षिकापातः' म्हणतात तसे संघटनेला राजकारणात पदार्पण केल्यानंतर अगदी पहिल्याच निवडणुकीत असे दारुण अपयश मिळाले. अपयशांची अशी मालिका पुढे चालूच राहिली.


 या निराशाजनक निकालानंतर आपली राजकीय भूमिका काय असावी याचा जोशी विचार करू लागले. आपली संघटना म्हणजे काही देशव्यापी पक्ष नाही, तसेच महाराष्ट्रातही स्वतःच्या बळावर सत्तेवर येण्याइतकी ती प्रबळ नाही याची जोशींना कल्पना होती. पण विचारान्ती त्यांनी काही संख्याशास्त्रीय आडाखे बांधले. आपल्या देशातील निवडणूक प्रक्रियेत जेमतेम ५० टक्के मतदान होते व ती मतेही तीन-चार उमेदवारांत विभागली जातात; त्यामुळे एकूण पडलेल्या मतांपैकी जेमतेम २० टक्के मते मिळवणारादेखील विजयी ठरतोः प्रत्यक्षात एकूण मतदारसंख्येच्या १० टक्के किंवा त्याहूनही कमी मतेच त्याला पडलेली असतात. उमेदवाराचे मताधिक्यही खूपदा जेमतेमच असते. अशा परिस्थितीत एखाद्या मतदारसंघातील पाच-दहा टक्के मते जरी आपण नियंत्रित करू शकलो, तरी राजकीय पक्षांवर आपला प्रभाव राहील, असा संख्याशास्त्राचा अभ्यास केलेल्या जोशींचा कयास होता. आपल्या सभांना होणारी गर्दी पाहता तेवढी मते आपण नक्कीच आपल्या मुठीत ठेवू शकतो; आणि त्यांच्या मते भविष्यात या देशात येऊ घातलेल्या, आघाडीचेच सरकार सत्तेवर येण्याच्या कालखंडात, तेवढ्या मतांच्या जोरावर आपण सरकारच्या निर्णयप्रक्रियेवर प्रभाव पाडू शकू असा विश्वासही त्यांना वाटला. स्वत: राज्य करण्यापेक्षा 'किंगमेकर' बनणे त्यांना अधिक श्रेयस्कर वाटले.

 इंदिरा काँग्रेसला शत्रू क्रमांक एक मानले, तरी निवडणुकीच्या वेळी दुसऱ्या कोणाला मत द्यायचे हे ठरवणे आवश्यक होते. त्यासाठी ठरले असे, की जो विरोधी पक्ष सत्तेवर येऊ शकेल

३२२अंगारवाटा... शोध शरद जोशींचा