पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३४१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कुमार शिराळकर, शिवसेनेचे मनोहर जोशी, बहुजन समाज पार्टीचे अशोक जगताप, भारतीय जनता पक्षाचे प्रमोद महाजन इत्यादी नेते आवर्जून हजर होते व त्यांची भाषणेही झाली. दिल्लीहून स्वामी अग्निवेश हेही खास आमंत्रित म्हणून हजर होते. शेतीमालाला रास्त दाम मिळावा व कृषिमूल्य आयोग बरखास्त करावा ह्या शेतकऱ्यांच्या दोन प्रमुख मागण्यांसाठी ३ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर एकाच वेळी एक तासाचा रास्ता रोको करायचा आणि इंदिरा काँग्रेस विरुद्ध सर्व विरोधी पक्ष एक होत असतील, तर त्यांच्या आघाडीला पाठिंबा द्यायचा असे अधिवेशनात ठरले.
 त्यानंतर लगेचच झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकांत काँग्रेस(आय)च्या विरोधात शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या पुरोगामी लोकशाही दलाला पाठिंबा द्यायचे ठरले. जोशींच्या मते त्यातल्या त्यात बळकट व म्हणून निवडून यायची शक्यता असलेला तोच पक्ष होता.
 धुळे अधिवेशनात केलेल्या आपल्या भाषणात पवारांच्या नेतृत्वाखालील पुलोदची भलावण करताना जोशी म्हणाले होते, "शेतकरी संघटनेने विरोधी पक्षांना एक आघाडी, एक नेता व एक कार्यक्रम अशा धर्तीवर युती करण्याचं आवाहन केलं आणि अभिनंदनीय गोष्ट अशी, की विरोधी पक्षांना जे गेल्या पाच वर्षांत जमलं नव्हतं ते यांनी आठ दिवसांत घडवून आणलं! एक आघाडी – पुरोगामी लोकशाही दल, एक नेता – शरद पवार, एक कार्यक्रम - पंधरा-कलमी कार्यक्रम! त्यातले पहिले कलम आहे, शेतीमालाला उत्पादनखर्चावर आधारित भाव. आणि म्हणून महाराष्ट्रात या आघाडीच्या मागे शेतकरी हातात रूमणं घेऊन उभा राहिला आहे."
 तसा शरद पवार यांच्याबरोबर शेतकरी संघटनेचा सुरुवातीपासून अधूनमधून संबंध येत राहिला होता. आंबेठाणला जोशींनी शेती सुरू केली तेव्हा पवार महाराष्ट्रात वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळात शेतीमंत्री होते. पुढे वसंतदादांविरुद्ध बंड पुकारून १९७८मध्ये ते मुख्यमंत्री बनले. वयाच्या अवघ्या अडतिसाव्या वर्षी. राज्याचे तोवरचे सर्वांत तरुण मुख्यमंत्री. नंतरच्या शेतकरी संघटनेच्या उदयाच्या काळात तेच मुख्यमंत्री होते. पण १९८० साली इंदिरा गांधी पुन्हा सत्तेवर आल्या, देशातील व महाराष्ट्रातील निवडणुकांत त्यांनी विरोधी पक्षांचे पानिपत केले व लगेचच पवार मंत्रिमंडळ बरखास्त करून टाकले. नंतरच्या निवडणुकीतही पवारांच्या गटाला फारसे यश मिळाले नाही. साखर कारखानदारी हे त्यांचे मोठे प्रभावक्षेत्र होते व साहजिकच शेतकरी आंदोलनाकडे त्यांचे बारकाईने लक्ष होते. ते स्वतःला शेतकरीनेता समजत असत. एकाएकी राज्यात उभे राहिलेले शरद जोशींचे आव्हान हा इतर सर्वच राजकीय नेत्यांप्रमाणे त्यांच्याही दृष्टीने चिंतेचा विषय होता. पण सगळ्यांशी संबंध जोडून ठेवण्याच्या स्वभावामुळे त्यांनी कधीच जोशींच्या विरोधात अशी उघड भूमिका घेतली नव्हती.

 ते स्वतः शेतकरी कुटुंबातील असल्याने शेतकऱ्यांचे प्रश्न ते समजून घेतील व सोडवतील अशी जोशींना आशा होती. साहजिकच राजकारणप्रवेशाचा निर्णय घेतल्यानंतर जोशींनी सर्वप्रथम साथ घेतली ती पवारांची.

राजकारणाच्या पटावर३२५