पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३६०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

राजकारणातील डावपेच त्यांना जमले नाहीत, त्यातील छक्केपंजे समजले नाहीत, आणि मुळात त्यांचे ते क्षेत्रच नसल्याने त्यात ते पराभूत झाले; अशीच बहुतेकांची भावना आहे. पाटील यांनी उपरोक्त लेखात म्हटल्याप्रमाणे, "सचिन तेंडुलकर कबड्डी खेळायला उतरावा तसे ते राजकारणात उतरले आणि पहिल्या फटक्यात बाद झाले." जोशींचे बहुतेक कार्यकर्ते ह्या विधानाशी सहमत होतील.
 अशी अनेक चांगली माणसे आपल्या अवतीभवती दिसतात जी तशी बुद्धिमान असतात, प्रामाणिक असतात, समाजाला देण्यासारखे असे त्यांच्याजवळ खूप काही असते; पण आपल्याकडची निवडणूकप्रक्रियाच अशी आहे, की त्यांचा निवडणुकीत प्रभाव पडत नाही. महात्मा फुले किंवा बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या महान नेत्यांनाही निवडणुकीतील दारुण अपयश चाखावे लागले होते. आचार्य अत्रेपासून एसेम जोशींपर्यंत इतरही अनेकांना हे अपयश पचवावे लागले आहे. लोकांचे प्रेम त्यांच्या वाट्याला येते, पण मते मात्र मिळत नाहीत; निवडणुकांचे गणित काही वेगळेच असते. अर्थात ह्यात खरे तर त्यांच्यापेक्षा एकूण समाजाचाच तोटा अधिक असतो.
 निवडणूक ही एक अजब घटना असते; तिला तार्किक कार्यकारणभाव लागू पडतोच असे नाही; त्याबाबत कुठलेही सिद्धांत किंवा नियम मांडता येत नाहीत. अनेक तथाकथित तज्ज्ञांनी, मान्यवर विचारवंतांनी केलेली निवडणूकपूर्व भाकिते मतदारांनी सपशेल चुकीची ठरवली आहेत. प्रत्यक्ष मतदान होते त्या काळात प्रत्येक ठिकाणची परिस्थिती वेगळी असते व तिचा प्रभाव मतदारांवर पडत असतो; तिच्याविषयी नेमके काही सांगणे अशक्यच असते.

 त्या त्या वेळी जी जी पावले उचलणे योग्य वाटले, ती ती पावले जोशींनी उचलली, एवढेच आता मागे वळून पाहताना म्हणता येईल. त्यांनी स्वतः एकदा ह्या प्रक्रियेचे वर्णन करताना एक सुरेख दृष्टांत दिला होता. डोंगर चढणारा माणूस ज्याप्रमाणे आधी एक हात किंवा एक पाय एखाद्या फटीत घट्ट रोवून ठेवतो, मग इतर तीन अवयवांच्या साहाय्याने वर सरकायला दुसरा कुठला आधार चाचपडून शोधतो व मग त्या आधारावर आणखी एक अवयव स्थिर करून आणखी वर सरकायला पुन्हा कुठलातरी आधार शोधतो; तशीच काहीशी त्यांची ही राजकारणातील वाटचाल होती. स्वतःजवळ एखाद्या मोठ्या पक्षाचे पाठबळ, घराण्याचा लौकिक, पैशाचा भरभक्कम आधार, धर्म वा जातीची शिडी, लोकांना भडकवता येईल असे काही धार्मिक वा स्थानिक अस्मितांचे प्रश्न वगैरेपैकी काहीच नसताना आणि त्यातही पुन्हा पारंपरिक व बहुमान्य समाजवाद नाकारत खुल्या अर्थव्यवस्थेचा उद्घोष करणाऱ्या, आपल्या अनुयायांच्या व काळाच्याही खूप पुढे असणाऱ्या द्रष्ट्या नेत्याला भारतातील निवडणुकांत फारसे यश मिळणे हे तसे अवघडच होते.

 "मी राजकारणात पडलो ह्यात सर्वांत जास्त नुकसान माझे स्वतःचेच होते, कारण केवळ एक शेतकरीनेता म्हणून राहिलो असतो तर मी महात्मापदी पोचायची बरीच शक्यता होती!" असे एकदा जोशी काहीशा विनोदाने, काहीशा गांभीर्याने म्हणाले होते.

३४४अंगारवाटा... शोध शरद जोशींचा