पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३६७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

स्थापना त्यांनीच पुढाकार घेऊन ३१ ऑक्टोबर रोजी वर्धा येथे झालेल्या वेगवेगळ्या १४ प्रांतांतील किसाननेत्यांच्या एका बैठकीत केली होती. हिचेच रूपांतर पुढे Kisan Coordination Committee (KCC, ऊर्फ किसान समन्वय समिती) मध्ये झाले.

 अन्य प्रांतांतील आंदोलनविस्ताराचा विचार करताना उत्तर प्रदेशातील किसाननेते चौधरी महेंद्रसिंग टिकैत यांचे नाव प्रामुख्याने पुढे येते. महेंद्रसिंग टिकैत हे एक लोकप्रिय, प्रामाणिक, रांगडे व काहीसे चमत्कारिक व्यक्तिमत्त्व. जाट कसे असतात ह्याविषयी असलेल्या प्रचलित कल्पनेत नेमके बसणारे. सिसौली हे त्यांचे मूळ गाव. तिथे त्यांची सात एकर वडिलोपार्जित शेती आहे. पण छोटी शेती असूनही त्यांना गावात व एकूणच त्या परिसरात खूप मान आहे. त्या भागात गेली सातआठशे वर्षे चालत आलेला खाप हा एक समाजरचनेचा प्रकार आहे. अनेक गावे मिळून एक खाप बनतो. टिकैत हे बालीयाना नावाच्या खापचे प्रमुख. त्यांच्या खापात आसपासची ८४ खेडी येतात. खापच्या प्रमुखाला चौधरी म्हणतात. माजी पंतप्रधान चरणसिंग हेही त्यांच्या खापचे प्रमुख होते. हे पद एवढ्या प्रतिष्ठेचे आहे, की चरणसिंग पंतप्रधान बनल्यानंतरसुद्धा आपल्या नावामागे आग्रहाने 'चौधरी' हे संबोधन लावून घेत. तिथले हे सर्वेसर्वा. नवरा-बायकोमधले भांडण असो की जमिनीवरूनचा तंटा असो, खापप्रमुख ठरवेल ते मान्य केले जाते. हे प्रमुखत्व वंशपरंपरेने येते. महेंद्रसिंग दुसरीत असतानाच त्यांचे वडील वारले व लगेचच ते त्यांच्या खापचे प्रमुख बनले. त्यांचे शालेय शिक्षण फक्त सहावीपर्यंत झाले आहे. पण त्यामुळे त्यांच्या समाजातील स्थानात काहीही उणेपणा आलेला नाही. ते जिथे जातील तिथे त्यांच्यासोबत त्यांचा एक भलामोठा हुक्का असे व कुठलीही चर्चा चालू असतानाही अधूनमधून ते तो ओढत असत. त्यांच्याबरोबर नेहमी चार-पाच बंदूकधारी पहारेकरीही असत. एक किसाननेता म्हणून साधारण १९८५च्या सुमारास ते पुढे आले.
 पूर्वी एकदोनदा ते आंबेठाणला येऊन जोशींना भेटून गेले होते. जोशीही त्यांच्या गावी जाऊन आले होते. त्यावेळी टिकैतांचा महिलांकडे पाहण्याचा अगदी जुनाट असा दृष्टिकोन अनेकांना खटकला होता. शेतकरी संघटनेत स्त्री-पुरुष असा भेद फारसा कधीच मानला गेला नाही; किंबहुना कामातील स्त्रियांच्या सहभागाला उत्तेजनच दिले जाई. त्यामुळे साहजिकच आंबेठाणला ते आले तेव्हा काही महिला कार्यकर्त्याही तिथे होत्या. टिकैतना ते आवडले नव्हते; जसे जोशींनी जीन्स व टी-शर्ट घालणेही त्यांना पसंत नसे. "असला पोशाख केलेल्या कोणाला मी कधी भेटतही नाही," असे तेच दोघांच्या पहिल्याच भेटीत म्हणाले होते. शरद जोशींच्या अगदी विरुद्ध असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते.

 टिकैत यांचा शेतीप्रश्नाचा व्यासंग वगैरे अजिबात नव्हता; तसा एकूणच त्यांचा वैचारिक आवाका सीमित होता. पण त्यांच्यामागे जाट शेतकरी खूप मोठ्या प्रमाणात होते; त्यांनी केवळ तुतारी फुंकली तरी हजारो शेतकरी त्यांच्याभोवती जमा होत. दिल्ली जवळ असल्याने दिल्लीतही त्यांचा दबदबा होता. शिवाय त्यांच्या प्रामाणिकपणाविषयी कोणालाही शंका नव्हती. त्यामुळे

राष्ट्रीय मंचावर जाताना३५१