पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३९५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भेटीतच आकर्षून घेणारे होते. जोशींच्या स्वभावात, वागण्याबोलण्यात एक कमालीची अनौपचारिकता होती. हा कदाचित पाश्चात्त्य संस्कारही असेल. ह्यामुळेही अनेक तरुण त्यांच्या संपर्कात आल्यावर भारावून जात. ह्या प्रथमदर्शनीच पडणाऱ्या प्रभावाची काही उदाहरणे लक्षात घेण्यासारखी आहेत.
 अंबाजोगाईचे अमर हबीब छात्र युवा संघर्ष वाहिनीतून आलेले. त्यांनी स्वतः उत्तम लेखन केलेच व शिवाय थोडा काळ 'शेतकरी संघटक'चे संपादक म्हणूनही काम पाहिले. आपल्या 'आकलन' या लेखसंग्रहात त्यांनी शरद जोशींबरोबर झालेल्या आपल्या पहिल्या भेटीचे वर्णन केले आहे. जोशींना भेटण्यासाठी पुण्याच्या शिवाजीनगर बसस्टँडवरील एका टेलिफोन बूथवरून त्यांनी फोन केला. त्यांच्याकडे कधी आणि कसे यावे ते विचारायला. 'तुम्ही तिथेच थांबा. मी तिकडेच निघालो आहे." म्हणत जोशी स्वत:च तिथे आले. कधी एकमेकाला पाहिलेले नाही; आपण त्यांना ओळखणार कसे, याची चिंता करीत हबीब थांबले होते. एवढ्यात तिथे पोचलेल्या जोशींनी त्यांच्या खांद्यावर हात ठेवीत विचारले, "तुम्ही अमर हबीब ना?" त्यांनी आपल्याला कसे ओळखले हा हबीबना पडलेला प्रश्न! जोशींना एसटी बसने नाशिकला जायचे होते. "चला, आपण त्या रिझर्वेशनच्या रांगेत उभे राहू. मला नाशिकचे रिझर्वेशन करायचे आहे." असे सांगून ते झपाझप पुढे चालू लागले. हबीब लिहितात,

शरद जोशी रिझर्वेशनच्या रांगेत उभे राहिले. आम्ही त्यांच्या आंदोलनाविषयी प्रश्न विचारले व त्यांनी उत्तरे दिली. जोशी म्हणाले, 'सगळ्या प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे आहेत असा माझा दावा नाही. आपण मिळून काम करू. त्यातून आपल्याला उत्तरं सापडतील. जोशींचे हे उत्तर माझ्या मनाला भावले. मी आतापर्यंत अनेक लोकांना भेटलो. जो तो आपल्याला सगळी उत्तरे माहीत आहेत अशा आविर्भावात बोलायचा. 'चला, आपण मिळून उत्तरं शोधू' असे कोणी म्हटले नव्हते. तसे फक्त शरद जोशी पहिल्यांदा म्हणाले. अशा माणसासोबत जायला भीती वाटत नाही.

(आकलन, पृष्ठ ८४)

 त्या काळात जोशी कसा एसटीने प्रवास करायचे; एवढेच नाही, तर स्वतः जाऊन रिझर्वेशनही कसे करायचे हे सगळे लक्षणीय आहेच, पण शिवाय पूर्णतः अपरिचित अशा एखाद्या तरुणाला त्यांनी इतक्या सहजगत्या भेटावे हेही दुर्मिळ आहे. अतिशय अकृत्रिम असा संवाद जोशी पहिल्या भेटीतच साधत आणि समोरच्याला जिंकून घेत. पुढे वर्षानुवर्षे हबीब यांनी जोशींबरोबर काम केले. जोशींचा मराठवाड्यातला पहिला दौरा त्यांनीच शेषराव मोहिते व सुधाकर जाधव यांच्या मदतीने आयोजित केला.

 पिंपळगाव बसवंतचे एक तरुण शेतकरी तुकाराम निरगुडे पाटील यांनाही जोशींनी असेच पहिल्या भेटीतच जिंकले होते. आपल्या कुटुंबासोबत एकत्र जेवायला बसवून आणि स्वतःच्या घरीच त्यांची रात्रीच्या मुक्कामाची सोय करून. मागे त्याबद्दल लिहिलेच आहे. त्या एका कृत्याने जोशींनी एक सहकारी जोडला; असा सहकारी की जो त्यांना प्रथम नाशिक

सहकारी आणि टीकाकार३७९