पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४२

हे पान प्रमाणित केलेले आहे.

बँकेचे जनरल मॅनेजर बनले. भणगे स्वतः पुढे शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू झाले.
 एक निष्णात प्राध्यापक म्हणून भणगेंचा लौकिक मोठा होता आणि म्हणूनच रत्नाप्पाअण्णांनी सगळी भिस्त त्यांच्यावर सोपवली होती. होते ते तसे काहीसे बुटके व स्थूल; पण त्यांचा आत्मविश्वास, त्यांचा ध्येयवाद, टापटीप यांमुळे त्यांची एकदम छाप पडत असे. नेहमी ते सुटाबुटात वावरत. कोल्हापुरात कॉमर्स कॉलेज काढणे म्हणजे मोठे आव्हान आहे ह्याची त्यांना जाणीव होती; किंबहुना म्हणूनच त्यांनी ही जबाबदारी स्वीकारली होती. त्यामुळे शिक्षणाचे माध्यम त्याकाळी इंग्रजी असूनही वर्गात ते अधूनमधून मराठीतही बोलत; विद्यार्थ्यांना सगळे नीट समजावे म्हणून. त्यामुळे विद्यार्थ्यांनाही ते आपलेसे वाटत. त्यांचा स्वभाव सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचा, सहकाऱ्यांना प्रेरित करण्याचा होता. शिवाय, संस्थाप्रमुख रत्नाप्पा कुंभार हेदेखील सदैव त्यांच्या मदतीला तयार असत. कोल्हापुरात कॉमर्स कॉलेज सुरू करणे हा त्यांच्या दृष्टीनेही प्रतिष्ठेचा प्रश्न होता.
 स्वतः जोशींच्या बाबतीत सुरुवातीलाच एक पेच निर्माण झाला. इथले कॉलेज सुरू होऊन जेमतेम तीन दिवस झाले आणि अचानक मुंबई विद्यापीठातील तीनही व्याख्यातेपदांसाठी निवड झाल्याच्या तीन तारा त्यांना एकाच दिवशी मिळाल्या! कुठले पद स्वीकारायचे हा निर्णय विद्यापीठाने त्यांच्यावरच सोपवला होता. जोशी ह्यांची पुन्हा एकदा द्विधा मनःस्थिती झाली. भणगे यांना सोडून जायचा बराच मोह झाला; पण भणगेंनी पन्हा काकुळतीने मनधरणी केली. 'मुंबई विद्यापीठाला तुमच्यासारखे इतर अनेक व्याख्याते मिळतील, पण आम्हाला इथे माणसं मिळवणं खूप अवघड आहे. एकदा तुम्ही इथे यायचं कबूल केल्यावर व त्या भरवश्यावर आम्ही कॉलेज सुरू केल्यावर तुम्ही आम्हाला असं मध्येच सोडून जाणं अन्यायाचं होईल, वगैरे ते सांगू लागले. नैतिकदृष्ट्या त्यांचे म्हणणे बरोबरही होते. शेवटी जोशींनी कोल्हापुरातच राहायचा निर्णय कायम केला. इथे राहूनच ते लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देणार होते.

 कोल्हापूर येथील पद्मा गेस्टहाउसमध्ये जोशी राहू लागले. मुंबईतील कॉलेजात इतर सर्व धनिक मुलांमध्ये त्यांची गणना गरीब विद्यार्थ्यांमध्येच होत होती; इथे मात्र ते एकदम धनवानांत गणले जाऊ लागले. त्याकाळी त्यांचा मासिक पगार प्राचार्यांच्या औदार्यामुळे महिना २१० रुपये होता व त्या परिस्थितीत एकट्या माणसासाठी तो खूप वाटत होता. कोल्हापुरातल्या अगदी सर्वोत्तम लॉजमध्येही महिन्याभराच्या शाकाहारी जेवणाचे फक्त तीस रुपये होत होते; मांसाहारी जेवणाचे पाच रुपये जास्त.

 जोशींचे व्यक्तिमत्त्व रुबाबदार होते. सहा फूट एक इंच उंची, भरदार शरीरयष्टी, चेहऱ्यावर बुद्धीचे तेज आणि मुंबईतील वास्तव्यात अंगी बाणलेला चटपटीतपणा याचे नाही म्हटले तरी ग्रामीण विद्यार्थ्यांवर एक दडपण यायचे. कॉलेजात इंग्रजीतून शिकवताना जोशी एकही मराठी शब्द वापरत नसत. इतर कॉलेजांतील मुलेही केवळ जोशींचे इंग्रजी ऐकण्यासाठी म्हणून वर्गात येऊन बसायची. पण इतक्या अस्खलित इंग्रजीची तिथल्या मुलांना अजिबात सवय नव्हती. ती सगळी मराठी माध्यमातली; अगदी अचंबित होऊन 'अजि म्यां ब्रह्म पाहिले'

४२अंगारवाटा... शोध शरद जोशींचा