पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४४१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 सैद्धांतिक पातळीवर विचार केला तरी, आज आपण सरकारकडून किमान भाव मागत आहोत, पण ते आपल्या एकूण खल्या अर्थव्यवस्थेच्या विचारसरणीत कायमस्वरूपी बसत नाही. ह्याचीही जोशींना पुरती जाणीव होती. आज गलितगात्र होऊन पडलेला शेतकरी एकदा का स्वतःच्या पायावर उभा राहिला, की मग त्याला अशा हमी भावाच्या कुबड्यांची गरजच पडणार नाही. लगेचच मिळेल त्या किमतीला माल विकण्याची त्याची गरज संपली, त्याच्याकडे माल साठवण्याचे, विक्रीसाठी अधिक धीर धरायचे सामर्थ्य आले, की तोच आपल्याला वाजवी दाम मिळेस्तोवर ताणून धरू शकेल. आज सरकारकडून आपण हमी भावाची जी अपेक्षा करत आहोत, ती आणीबाणीच्या स्थितीत आगीचा बंब बोलावण्यासारखी आहे; अजून काही वर्षांनी आपल्याला अशा सरकारी हस्तक्षेपाची गरजच राहणार नाही. आज सगळी बाजारपेठ व्यापारी व दलाल यांच्या नियंत्रणाखाली आहे आणि त्यांच्याशी बरोबरीच्या नात्याने देवाणघेवाण करण्याची वर्षानुवर्षे पिळून निघालेल्या शेतकऱ्यात आज ताकद नाही. पण एकदा ती आली, की तो स्वतःच्या हितसंबंधांचे रक्षण स्वतःच करू शकेल; त्यातूनच इंडिया व भारत यांच्या संतुलनाकडे वाटचाल होऊ शकेल.
 याशिवाय आपल्या विचाराला आज मोठे पाठबळ मिळत असले तरी तो विचारही कालातीत नाही; त्याचे आयुष्य फारतर अजून पंधरा-वीस वर्षे आहे, काळाच्या ओघात समाजाच्या गरजा बदलत जातात आणि उद्याच्या समाजासाठी वेगळी कुठलीतरी विचारसरणी अधिक उपयुक्त ठरू शकेल, हेही त्यांनी स्वतःच अनेकदा स्पष्ट केले होते. खरे तर शेतकरी संघटनेचा राजकीय प्रवास हादेखील केवळ 'आंदोलन एके आंदोलन' हे कायमस्वरूपी चालू शकणारे धोरण नाही, ध्येयप्राप्तीसाठी राजकीय पर्याय शोधायला हवा आणि त्यातूनच व्यवस्थात्मक बदल घडू शकतील, या जाणिवेतूनच सुरू झाला होता. दुर्दैवाने पुढे तोही मार्ग खुंटला. अशा अनेक कारणांमुळे १९९१ सालच्या देशातील उदारीकरणाच्या पर्वानंतर आपण काहीतरी नवी, कालानुरूप मांडणी करायला हवी हे जोशींना अधिकच प्रकर्षाने जाणवू लागले.
२२ सप्टेंबर १९९१ रोजी वर्धा येथील कार्यकारणीच्या बैठकीत, नंतर १० नोव्हेंबर १९९१ रोजी शेगाव येथील शेतकरी मेळाव्यात आणि त्यानंतर २८ फेब्रुवारी १९९३ रोजी मुंबईतील कार्यकारिणीच्या बैठकीत जोशींनी ही नवी गरज कार्यकर्त्यांसमोर मांडली, काही उपाय सुचवले. दरम्यानच्या काळातही संधी मिळेल तेव्हा ते काहीतरी नवी मांडणी करतच होते. म्हणजे लढाई तीच होती; पण हत्यारे नवी होती, व्यूहरचना नवी होती. या व्यूहरचनेचे स्वरूप साधारण पुढीलप्रमाणे होते :
 शेतकरी संघटनेने गेली दहा-बारा वर्षे केलेला संघर्ष हा आवश्यकच होता; पहिली ठिणगी पडायची असेल तर गारगोटी घासावीच लागते. पण गारगोटीच्या घासण्यातून प्रत्येक वेळी ठिणगीच पडत राहील, त्यातून ज्योत तयार होणार नाही. ज्योतीसाठी वात लागते, तेल लागते. त्यासाठी आपल्याला वेगळा दिवा शोधावा लागेल. ठिणगीने तिचे काम केलेले आहे, आता गरज आहे ती ज्योतीची. आपण सरकारला सादर केलेल्या राष्ट्रीय कृषी नीतीचा मसुदा


अंगाराकडून ज्योतीकडे : शोध नव्या दिशांचा - ४१७