पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४४२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________

सरकारने बासनात बांधून ठेवून दिला आहे; आता नवे सरकार ह्या मसुद्याकडे वळून बघायची शक्यता नाही. या परिस्थितीत आपण आपल्याच मर्यादित बळावर काही करू शकतो का, ह्याचा विचार करायला हवा.
 अगदी लगेच टाकता येईल असे पहिले पाऊल म्हणून त्यांनी चतुरंग शेतीची संकल्पना मांडली. या संकल्पनेला सीता शेती, माजघर शेती, व्यापारी शेती आणि निर्यात शेती असे चार आयाम होते.
 सीता शेती म्हणजे प्रयोग शेती. शेतकरी महिलेने आपल्या स्वतःच्या शेतात, स्थानिक पातळीवर सहजगत्या उपलब्ध असणाऱ्या साधनांच्या साहाय्याने, कुठल्याही खर्चीक यंत्रसामग्रीच्या किंवा खतांच्या मागे न लागता, स्वतःला जमतील असे वेगवेगळे प्रयोग करत शेती करायची. मुळात शेतीचा शोध स्त्रियांनीच लावला आहे व त्याच आपली कल्पकता वापरून नवी नवी तंत्रे शोधून काढतील यावर जोशींचा पूर्ण विश्वास होता. त्यावेळच्या लक्ष्मीमुक्ती अभियानात ज्या दीड-दोन लाख स्त्रियांच्या नावावर जमिनीचा एखादा छोटा तुकडा तरी झाला होता, अशा स्त्रिया सीता शेतीची संकल्पना मांडताना त्यांच्या डोळ्यांपुढे प्रामुख्याने होत्या.
 माजघर शेती म्हणजे प्रक्रिया शेती. जो शेतीमाल आपण पिकवला असेल, तो तसाच्या तसा पोत्यात भरून बाजारात न नेता, त्यावर घरच्या घरी काही ना काही प्रक्रिया करून मगच तो बाजारात नेणे. ह्या प्रक्रियेतही कुठलाही मोठा कारखाना, यंत्रसामग्री वगैरे पसारा जोशींच्या डोळ्यापुढे नव्हता. स्वतः शेतकरी महिला करू शकेल असेच काहीतरी त्यांच्या मनात होते. उदाहरणार्थ, शेतातला माल घरीच स्वच्छ करायचा, निवडायचा, त्याच्या दोन-दोन किंवा पाच-पाच किलोच्या पिशव्या करायच्या आणि मग तो बाजारात न्यायचा. एवढ्यानेदेखील शेतकरी महिलेच्या हाती चार पैसे अधिक येणार होते. पुन्हा यासाठी सरकारवर अथवा अन्य कोणावर अवलंबून राहण्याची काहीच गरज नव्हती. कुठल्याही शेतकरी महिलेला घरच्या घरी सहज जमणारे असे हे मूल्यवर्धन होते.
 तिसरा आयाम होता व्यापारी शेती. म्हणजे अशी पिके घेणे ज्यांना बाजारात मागणी आहे आणि स्वतः बाजाराशी संधान बांधणे; त्या मालासाठी बाजारपेठ तयार करणे, महिलांनी थोडीफार प्रक्रिया करून तयार केलेला माल बाजारात पोचवणे आणि खपवणे. याला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळेल असे जोशींचे मत होते. कारण त्याला थेट शेतकऱ्याकडून ताजा, स्वच्छ व बिनभेसळीचा माल मिळणार होता. यासाठी मात्र एखादी व्यापक यंत्रणा उभारावी लागणार होती. त्या दृष्टीने पाच हजार दुकानांची 'शिवार'सारखी एक साखळी उभारायची योजना त्यांनी मांडली होती.

 निर्यात शेती हा चौथा आयाम होता. आपल्या शेतीमालाला उत्तम भाव मिळेल अशी परदेशातील बाजारपेठ त्यासाठी शोधणे व तसा पुरवठा नियमित सुरू करणे. त्यासाठीदेखील एखादी यंत्रणा उभारणे आवश्यक होते. पण आपण जर दर्जा चांगला ठेवला तर एकूण उत्पादित मालापैकी १० टक्के माल तरी आपण निर्यात करू शकू असा जोशींचा विश्वास होता.


४१८ - अंगारवाटा... शोध शरद जोशींचा