पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४४३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________

 ह्या चतुरंग शेतीतून नेमके काय जोशींना साधायचे होते? एकतर ह्यातून प्रत्येक शेतकरी कुटुंबाला स्वतःच्या हातांनी करण्यासाठी काहीतरी काम मिळणार होते. गांधीजींच्या सूतकताईच्या कार्यक्रमाशी ह्या उपक्रमाचे थोडेफार साम्य होते. यातून संपत्तिनिर्माण होणारच होते, पण विशेष म्हणजे असंख्य शेतकरी बांधवांना एका विधायक कामात सहभागी व्हायची संधी मिळणार होती. संघटना टिकवण्यासाठी हे उपयुक्त होते. आंदोलनासाठी इतकी वर्षे आपण एकत्र येत गेलो, आता अशा विधायक कार्यक्रमासाठी एकत्र यायला काय हरकत आहे, असा त्यांचा विचार होता. सरकारी हस्तक्षेपाशिवाय आपण शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी काही करू शकतो का, याचीही ही चाचपणी होती.
 ह्या संकल्पनेला मूर्त रूप देण्यासाठी त्यांनी तासगावची द्राक्षक्रांती ज्यांच्यामुळे यशस्वी झाली, त्या साताऱ्याच्या श्री. अ. दाभोळकर यांची व त्यांच्या प्रयोगपरिवाराची मदत घेतली. शेतकरी भगिनींसाठी दाभोळकरांची खास प्रशिक्षण शिबिरे आयोजित केली. एरव्ही आपल्या प्रत्येक व्याख्यानासाठी तिकिट लावणारे व 'माझे विचार ऐकायचे असतील, तर त्यासाठी तुम्ही पैसे मोजलेच पाहिजेत' असा एक तत्त्व म्हणून आग्रह धरणारे दाभोळकर शेतकरी संघटनेच्या शिबिरांसाठी आनंदाने विनामोबदला वेळ देऊ लागले. काडीकचरा, सांडपाणी आणि भारतात मुबलक व फुकट उपलब्ध असणारा सूर्यप्रकाश ह्यांचा वापर करून आपल्याच आवारात आपण उत्तमप्रकारे काय काय पिकवू शकतो ह्याबाबत दाभोलकरांनी मार्गदर्शन केले. पुढे महिला आघाडीने गावोगावी फिरून महिलांना स्थानिक पातळीवर प्रत्यक्ष मदत करण्यासाठी अनेक प्रशिक्षकदेखील तयार केले. नेहमी रास्ता रोको अन् रेल रोको अशा आंदोलनासाठी प्रसिद्ध असलेल्या शेतकरी संघटनेचे हे एक अगदी निराळे असे रूप यातून लोकांपुढे येऊ लागले.
 त्या व्यतिरिक्त संस्थात्मक पातळीवरही जोशींनी तीन व्यावसायिक उपक्रमांच्या कल्पना मांडल्या व त्यांच्या काही सहकाऱ्यांच्या पुढाकारातून त्या उपक्रमांना आकार द्यायला सुरुवातही झाली.
 त्यांतला पहिला उपक्रम होता 'शेतकरी सॉल्व्हंट' या नावाची एक कंपनी. सोयाबीनची माहिती त्यावेळेस्तोवर अनेक शेतकऱ्यांना झाली होती व सोयाबीनची लागवडही अनेक शेतकरी करत असत. सोयापासून तेल निघायचे. सोयाबीनमध्ये प्रोटिन्स भरपूर असतात व त्यामुळे त्याला ग्राहकांकडून मागणीही चांगली होती. सोयामिल्कसारखी काही नवी उत्पादनेही त्यातून तयार होत होती. परदेशांतूनही ह्या पिकाला चांगली मागणी होती. उसाप्रमाणेच हा एक शेतकऱ्याला चार पैसे मिळवून देणारा नवा असा पर्याय होता. 'शेतकरी सॉल्व्हंट'च्या नियोजित प्लॅंटमध्ये आधी विक्रीसाठी सोया ऑइल काढायचे व ते काढल्यानंतर उरलेला सोया केकदेखील त्याचे बारीकबारीक तुकडे (चंक्स) करून विकायचा, अशी योजना होती. अशा सोया उत्पादनांना नुसत्या सोयाबीनपेक्षा निर्यातीसाठी अधिक मागणी होती. हिंगणघाट येथे प्रायोगिक तत्त्वावर कंपनीचा एक प्लॅन्ट उभारण्यातही आला. दुर्दैवाने हा उपक्रम स्थिर

अंगाराकडून ज्योतीकडे : शोध नव्या दिशांचा - ४१९