पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४६३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________

म्हाताऱ्या, दाढी वाढवलेल्या, रापलेल्या, पण तरीही करारी अशा शेतकऱ्याचे चेहरे पाहताच ती पोस्टर्स आपली वाटत. त्यांच्या मांडणीत कल्पकता असे. प्रथमच उभ्या राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या चळवळीची असलेली ही कलात्मक आणि काव्यात्मक बाजू स्वतंत्र लेखाचा विषय होऊ शकते.


(शरद जोशी, शेतकरी संघटना आणि माझी कविता,

अंतर्नाद, ऑक्टोबर २००९)

नेत्याची प्रतिभा ही प्रत्येक वेळी फक्त त्याच्या भाषणातून आणि लेखातूनच व्यक्त होते असे नाही. त्याने प्रचारासाठी जी साधने निवडली असतात, त्यांतूनही ही प्रतिभा दिसते. बळीराज्य, सीताशेती, लक्ष्मीमुक्ती वगैरे पारंपरिक शब्दांचा जोशींनी केलेला वापर खूप कल्पक आहे.

 जालना येथील शेतकरी संघटनेच्या अधिवेशनात इंद्रजित भालेराव यांनी आपली 'शिक बाबा शिक, लढायला शिक, कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक' ही गाजलेली कविता लाखाहन अधिक शेतकऱ्यांसमोर म्हटली होती. तो प्रसंग सांगताना उपरोक्त लेखात भालेराव लिहितात,

टाळ्यांच्या रपरप आवाजात मी कविता म्हणत होतो. लोक इतक्या तालात टाळ्या कसे काय वाजवताहेत, म्हणून सहज मागे फिरून बघितलं, तर जोशीसाहेब स्वतः एखाद्या संगीतकाराच्या आविर्भावात तालाचं संचलन करत होते आणि त्या तालावर लोक टाळ्या वाजवत होते. मला माझं आयुष्यच धन्य झाल्यासारखं वाटलं, कविता म्हणून झाल्यावर लोकांनी प्रचंड जल्लोष केला. भारावलेल्या अवस्थेत मी माझ्या जागेवर येऊन बसलो. सभेत चैतन्याचा संचार झाला होता.<blockquote|>

 मराठी साहित्यविश्वाने जोशींकडे केलेल्या दुर्लक्षाच्या पार्श्वभूमीवर एका मोठ्या बंगाली कादंबरीकाराने त्यांचा केलेला एक उल्लेख विशेष लक्षणीय आहे. उपरोक्त लेखातच भालेराव त्याविषयी लिहितात,

देबेश रॉय हे फार मोठे बंगाली कादंबरीकार आहेत. बंगालच्या ग्रामीण भागाचं आणि कृषी जीवनाचं चित्रण करणाऱ्या हजारो पानांच्या कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या आहेत. 'तिस्ता पारेर वृत्तान्त' ही त्यांची कादंबरी माझ्या वाचनात आलेली आहे. 'तिस्तेकाठचा वृत्तान्त' असं त्या कादंबरीचं मराठी भाषांतर नगरच्या विलास गीते यांनी केलेलं आहे. तिला साहित्य अकादमीचा पुरस्कारही मिळालेला आहे. साहित्य अकादमीनेच ती मराठीमध्ये प्रकाशित केलेली आहे. आठशे पानांच्या या कादंबरीत तिस्ता नदीच्या काठावर जीवन जगणाऱ्या शेतकऱ्यांचं भेदक चित्रण आलेलं आहे. शेवटी या कादंबरीत देबेश रॉय यांनी लिहिलं आहे, 'शेतकऱ्यांच्या या समस्येवर बंगाल सरकारनं काही उपाय शोधून काढला नाही, तर हे शेतकरी महाराष्ट्रातल्या<blockquote|>


साहित्य आणि विचार - ४३९