पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४६८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



विचारपद्धतीचा आधुनिक पाश्चात्त्य जगावर जोरदार ठसा आहे. अर्थात प्रस्तावनेत ह्या त्रुटीचा जोशींनी स्वतः उल्लेख केला आहे व पुढील आवृत्तीत ती उणीव भरून काढायचे वाचकाला आश्वासनही दिले आहे. ती पुढची आवृत्ती कधी निघाली नाही हा भाग सोडा. आयन रँड ही अमेरिकन लेखिका व्यक्तिशः त्यांच्या सर्वात आवडीची. मला कधीही उदास वाटू लागलं, की मी तिचं एखादं पुस्तक वाचायला घेतो,' असं ते म्हणाले होते.
 जग बदलणारी पुस्तके हे शरद जोशींचे पुस्तक तसे छोटेखानी आहे; फक्त १२७ पानांचे. पण तरीही त्याच्याविषयी इथे काहीसे विस्ताराने लिहिले आहे, कारण जोशींनी जी पुस्तके इथे निवडली आहेत त्यांवरून त्यांच्या स्वतःच्या विचारसरणीबद्दलही बरेच काही स्पष्ट होते. पुस्तकाचे शीर्षक 'जग बदलणारी पुस्तके' असले तरी 'मला घडवणारी पुस्तके' हे शीर्षकही या पुस्तकाला चालले असते.

  अंगारमळा हे त्यांचे साहित्यिक मापदंडावर विचार करता मला खूप आवडलेले पुस्तक. त्यातील अंगारमळा हा पहिला लेख साप्ताहिक ग्यानबा'मध्ये २६ सप्टेंबर १९८८ रोजी प्रकाशित झाला होता. ह्यात त्यांनी स्वित्झर्लंडहून भारतात परत आल्यानंतरच्या काही दिवसांचे हृदयस्पर्शी वर्णन केले आहे. या लेखाचे त्यांच्या स्वत:च्या अक्षरातील हस्तलिखितही सुदैवाने उपलब्ध आहे व त्याच्या पहिल्या पानावर उजव्या कोपऱ्यात स्वातंत्राच्या कक्षा या आगामी आत्मचरित्रात्मक निवेदनातील काही भाग' असे लिहिले आहे. यावरून त्यांना आत्मचरित्र लिहायचे होते व त्याचे शीर्षकही त्यांनी त्यावेळी ठरवले होते हे जाणवते. पण प्रत्यक्षात ह्या पुस्तकात स्वातंत्र्याच्या कक्षा' या विषयावर काहीच नाही. निव्वळ आत्मचरित्र असेही या पुस्तकाला म्हणता येणार नाही. या पुस्तकातील एकूण चौदा लेखांपैकी स्वतःविषयी फक्त चार लेख आहेत. ते उत्कृष्ट आहेत, पण त्यांतून त्यांचे सलग असे चरित्र उभे राहत नाही. पुस्तकातील सहा लेख म्हणजे व्यक्तिचित्रे आहेत; त्यांच्या मातोश्री इंदिराबाई, शंकरराव वाघ, बाबूलाल परदेशी, शेवाळेगुरुजी, दत्ता सामंत, दुर्गा भागवत व मनोहर आपटे (शेवटच्या दोघांची एकत्रित) यांची. पुस्तकातले दोन साहित्यविषयक लेख म्हणजे त्यांनी केलेल्या दोन भाषणांचे शब्दांकन आहे. पुस्तकातील सर्वांत मोठा तीस पानांचा लेख आहे, बस करा हे समाजसेवेचे ढोंग! हा त्यांनी अंतर्नाद मासिकाच्या १९९९च्या दिवाळी अंकासाठी लिहिला होता.
 जोशींचे शब्दवैभव कोणाही प्रस्थापित लेखकाने हेवा करावा असे आहे. 'म्हातारीच्या चेहऱ्यावरील सुरकुत्यांमध्ये कोरून ठेवलेले पिढ्यानपिढ्यांचे दारिद्र्य' ह्यासारखे शब्दप्रयोग ते सहज करून जातात. याच पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा त्या वर्षीचा 'आत्मचरित्र' या गटासाठी असलेला प्रथम पुरस्कारदेखील मिळाला होता. साहित्यासाठी त्यांना मिळालेला हा बहुधा एकमेव पुरस्कार असावा. “स्पर्धेसाठी मी कधीच पुस्तक पाठवणार नाही व तसे ते पाठवायचे नाही अशी ताकीद मी प्रकाशकांना दिलेली आहे," असे ते पूर्वी एका भाषणात म्हणाले होते, पण बहुधा त्यांच्या प्रकाशकाकडून हे पुस्तक परस्पर पाठवले गेले असावे व

४४४ - अंगारवाटा... शोध शरद जोशींचा