पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४७७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अधिक होती! त्यावेळी सभागृहात झालेल्या चर्चेबद्दल जोशी म्हणतात,
  "शाळकरी मुलांना स्वातंत्र्याच्या पन्नास वर्षांविषयी निबंध लिहून आणायला सांगितले असते, तरी ते खासदारांच्या वक्तव्यापेक्षा उजवे झाले असते. भारताच्या अर्थव्यवस्थेवरील कोणत्याही क्रमिक पुस्तकात सहज उपलब्ध होणारी, शेकडो वेळा वापरून गुळगुळीत झालेली आकडेवारी आणि माहिती, आणि आपण काही भलेमोठे सांगत आहोत असा आवेश आणि दंभ!"
 या सगळ्या पार्श्वभूमीवर १०,११,१२ डिसेंबर १९९८ या काळात अमरावती येथे शेतकरी संघटनेने एक जनसंसद भरवली होती. आत्मचिंतन हा त्यामागचा उद्देश. त्या निमित्ताने स्वातंत्र्य का नासले? हे एक ११०-पानी पुस्तक जोशींनी प्रकाशित केले. त्यातील त्यांचे विश्लेषण विचारप्रवर्तक आहे. गेल्या पन्नास वर्षांत जे काही अभद्र घडत गेले त्याची मुळे स्वातंत्र्यपूर्व काळातच कशी दिसतात हे त्यांनी दाखवले आहे.
 शरद जोशींचे अनेक विचार त्यांच्या कार्यातही प्रकर्षाने प्रतिबिंबित झाले आहेत; त्यातून त्यांच्या कार्याला एक वैशिष्ट्यपूर्ण वेगळेपण आपोआपच लाभते. त्यांच्या कार्यातील व आनुषंगिक मांडणीतील पाच वैशिष्ट्ये कायम प्रेरणादायी ठरतील अशी आहेत. ही पाच वैशिष्ट्ये म्हणजे त्यांच्या वैचारिक वारशाचा महत्त्वाचा भाग आहे.

 पहिले वैशिष्ट्य म्हणजे, त्यांची निर्विवाद जातिधर्मप्रांतभाषानिरपेक्षता. अन्य नेत्यांपासूनचे त्यांचे हे एक प्रमुख वेगळेपण.
 मिशनच्या शाळेत शिकलेले वडील आणि पंढरपूरची असून बडव्यांची चीड असलेली आई ह्यांच्या पार्श्वभूमीमुळे जोशी कुटुंबात ब्राह्मणी कर्मठपणा किंवा ब्राह्मण्याचा अहंकार असा कधीच नव्हता. स्पृश्यास्पृश्यतातर अजिबात नव्हती. जोशी म्हणतात, "गायकवाड नावाचा एक हरिजन वर्गमित्र पाणी प्यायचं झालं, तर फक्त आमच्या घरी येत असे." त्या काळाचा विचार केला तर त्यांचे आईवडील तसे पुरोगामीच होते; त्यांचे संस्कार या जातिधर्मनिरपेक्षतेला कारणीभूत होतेच; पण शिवाय त्यांच्या सखोल विचारांचाही हा एक परिपाक होता.
 दरवर्षी आपण धर्म बदलायचा आणि वेगवेगळ्या धर्मांचा अनुभव घ्यायचा असाही त्यांचा लहानपणी इरादा होता; अर्थात प्रत्यक्षात तो आणणे शक्य नव्हते, पण मुळात असा विचार त्यांनी करावा याचेही नवल वाटते. पुढे मुंबईसारख्या कॉस्मोपॉलिटन शहरात शिक्षणासाठी गेल्यावर व मुख्य म्हणजे तिथल्या सिडनमसारख्या परप्रांतीयांचा भरणा असलेल्या कॉलेजात सहा वर्षे काढल्यावर जातिधर्माचा कुठलाच विचार त्यांच्या मनात राहिला नाही. हे त्यांचे व्यक्तिवैशिष्ट्य पुढे शेतकरी संघटनेतही उतरले.
  पण त्याचबरोबर ब्राह्मण घरात जन्मल्याचे काही फायदे आपल्याला निश्चित मिळाले हे ते मानत. ब्राह्मण्याचे म्हणून काही विशिष्ट जीन्स आपल्यात आले असे नाही, पण ब्राह्मण्याचे म्हणून काही विशिष्ट संस्कार आपल्यावर झाले हे ते कबूल करतात. उदाहरणार्थ, घरी रोज संध्याकाळी सगळ्यांनी जमिनीवर मांडी घालून बसायचे व मोठ्याने रामरक्षा म्हणायची अशी


साहित्य आणि विचार - ४५३