पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४८३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

हिंदुस्थानातील कापसाच्या भावापेक्षा कमी आहे. हे घडले याचे कारण अमेरिकन शेतकऱ्यांनी हरित क्रांतीच्या पुढे पाऊल टाकून जनुक क्रांतीत भाग घेतला.


आपल्याकडे मात्र आपण या नवीन तंत्रज्ञानाच्या क्रांतीच्या बाबतीत हरित क्रांतीच्या वेळेपेक्षाही अधिक बेसावध आहोत. आपल्याकडचे थोर थोर विचारवंत, थोर थोर साहित्यिक, थोर थोर पत्रकार हे नवीन तंत्रज्ञानाने येणारी प्रत्येक गोष्ट म्हणजे परमेश्वराविरुद्धचा कट आहे, ते पाप आहे, मनुष्यप्राण्याने असल्या गोष्टी करण्याच्या फंदात पडू नये अशी हाकाटी करतात. याच मंडळींनी, हिंदुस्थानात पहिल्यांदा आगगाडी आली तेव्हा विरोध केला. रासायनिक खते आणि औषधे यांनाही याच लोकांनी विरोध केला. नवीन कोणतीही गोष्ट आली, की त्याला विरोध करण्याची ही वृत्ती म्हणजे ज्ञानाला संकुचित करणारी वृत्ती आहे.


               (माजी केंद्रीय कृषी राज्यमंत्री कै. अण्णासाहेब शिंदे स्मृती व्याख्यान,
                                            श्रीरामपूर, १२ जानेवारी २०००)
  तंत्रज्ञानातून अनेक समस्या निर्माण होतात याची अर्थातच त्यांना जाणीव होती, पण त्या समस्यांवर उत्तरेही अधिक प्रगत तंत्रज्ञानातूनच निघतील, इतिहासाची चक्रे उलटी फिरवणे वेडेपणा होईल यावर त्यांचा पूर्ण विश्वास होता. म्हणूनच निसर्गशेती हा आपल्यापुढचा पर्याय होऊ शकत नाही, त्यातून जगातील अब्जावधींचे पोट भरेल इतके उत्पादन होऊ शकत नाही व भोंगळपणे तसा आग्रह धरला तर जगात लाखो भूकबळी पडतील असे ते मानतात. तंत्रज्ञानाच्या उपयुक्ततेबद्दल इतरांचा आणि स्वत:चाही बुद्धिभेद होईल अशी भोंगळ मांडणी त्यांनी कधीही केली नाही.

 शरद जोशींचा पाचवा महत्त्वाचा वैचारिक वारसा म्हणजे त्यांनी शेतकऱ्याला दिलेला स्वाभिमान.
 त्यांनी आयुष्यभर पाठपुरावा केलेले स्वातंत्र्य व खुलेपण ह्या स्वभिमानाशीच जोडलेले आहे. 'मेंढरे म्हणून नव्हे, माणसे म्हणून जगा', हा त्यांचा कायम संदेश असायचा. शेतीमालाच्या भावाचा प्रश्न त्यांनी स्वातंत्र्याची गुरुकिल्ली म्हणून हाती घेतला; कारण स्वातंत्र्यावरचा सर्वांत मोठा घाला गरिबी हा आहे व ती गरिबी बहुसंख्य शेतकरी असलेल्या आपल्या देशात शेतीमालाला वाजवी भाव मिळत नाही म्हणून आहे, अशी त्यांची धारणा होती.
 शेतकऱ्याच्या स्वाभिमानाची जपणूक जोशींनी अगदी प्रथमपासून जाणीवपूर्वक केली. शेतकरी संघटना : विचार आणि कार्यपद्धती या पुस्तकात ते म्हणतात :

आम्ही शेतकऱ्याला एकच सांगतो - हा माल पिकवण्यासाठी तू जितका खर्च करतोस, तितके पैसे जरी तुला मिळाले तरी तुला, तुझ्या पत्नीला किंवा मुलाबाळांना मोफत शाळा, मोफत दवाखाना, कर्जमाफी, निराधार अनुदान योजना असल्या


                                         साहित्य आणि विचार - ४५९