पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४८८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

गेलेच. ह्या अध्यात्माच्या बाबतीतही जोशींनी आपला मार्ग सोडला नाही; आपली साधना अगदी शेवटाशेवटापर्यंत ते करतच राहिले.
 शेवटच्या काही दिवसांत जेव्हा जेव्हा ते आंबेठाणला जात, तेव्हा तेव्हा ज्ञानेश्वरी, तुकारामांची गाथा वगैरेचे अर्थासह वाचन करत. ह्यावेळी श्याम पवार व सुरेशचंद्र म्हात्रेदेखील त्यांच्याबरोबर असत. शंकराचार्य हा त्यांचा विद्यार्थिदशेपासूनच जिव्हाळ्याचा विषय होता. कुंडलिनी जागृती, योगसाधना यांविषयीदेखील ते वाचन करत. ३ सप्टेंबर २०१५ रोजी त्यांचा ऐंशीवा वाढदिवस त्यांनी श्याम पवार यांच्या आंबेठाणजवळच्या म्हाळुगेमधील हॉटेलातच अगदी साधेपणे व काही मोजक्याच सहकाऱ्यांच्या उपस्थितीत साजरा केला. पवार लिहितात,

संघटनेचे एक श्रद्धावान कार्यकर्ते, यवतमाळचे बापट यांची कन्या सानिका, आळंदीचे ह.भ.प. किसन महाराज साखरे यांची सून झाली आणि आळंदीला आली. त्या संबंधातून त्यांच्याशी भेटीचा योग जुळून आला. शरद जोशी आम्हाला समवेत घेऊन तीन वेळा साखरे महाराजांच्या भेटीला गेले. आपल्या मनातील आध्यात्मिक भूक यामुळे शमविता येईल असा त्यांचा प्रयत्न होता. तथापि, साखरे महाराजांनी विशेष चर्चा केली नाही असे मला जाणवले. कदाचित पंढरपूरची वारीची परंपरा आणि एकूणच वारकरी संप्रदायाच्या विषयाने सुरुवातीच्या दिवसांत शरद जोशी यांनी जी जाहीर मते व्यक्त केली होती, त्याचाही तो परिणाम असावा. त्यानंतर भेट झाली नाही. आजारानेही चांगलेच मूळ धरले होते.


(बळीराजा, सप्टेंबर २०१६, पृष्ठ ३३-४)
  हॉस्पिटलच्या वाऱ्या सांभाळनही जोशी आपल्यापरीने आध्यात्मिक साधना करतच राहिले. पुढे अंथरुणाला खिळल्यावरच ते नाइलाजाने थांबले. ह्या अध्यात्मयात्रेत त्यांना काही प्रकाशकण गवसले होते का, हा प्रश्न आता कायम मूक राहणार आहे.
 ७ जुलै २०१०मध्ये राज्यसभेचा सहा वर्षांचा कालावधी संपल्यावर जोशी कायम वास्तव्यासाठी पुण्याला परतले. दिल्लीला असतानाच आंबेठाण येथील ज्या प्लॉटवर घर होते तो प्लॉट सोडून, आजूबाजूची शक्य तेवढी शेतजमीन विकायचा निर्णय त्यांनी घेतला होता. १९७७ साली घेतली, तेव्हा ती एकूण साडेतेवीस एकर होती व त्यातली १८ एकर, म्हणजे साधारण तीन चतुर्थांश जमीन, त्यांनी २००५ ते २००७ या कालावधीत दोन-तीन टप्प्यांत विकली. अर्थात आज त्याची किंमत बरीच जास्त मिळाली असती, पण तसा विचार करण्यात काहीच अर्थ नाही.
 आदली पंचवीस-तीस वर्षे आर्थिकदृष्ट्या त्यांना फारच हलाखीची गेली होती; नोकरी सोडताना मिळालेले फंडाचे व इतर थोडेफार साठवलेले पैसे घर व शेती खरीदण्यात गेल्यावर नियमित उत्पन्न असे फारच थोडे होते. शेती कायम तोट्यातच होती. महागाईच्या दिवसांत ४६४ - अंगारवाटा... शोध शरद जोशींचा