पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४९०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



असताना, माझ्या घरखर्चासाठी म्हणून, एक हजार रुपये गुपचूप हाती ठेवले होते आणि त्यावेळी ती रक्कम मला बरीच मोठी वाटली होती," असे जोशी एका भाषणात गहिवरलेल्या आवाजात म्हणाले होते. प्रस्तुत लेखकाला फराटे यांनी पाठवलेल्या १० मार्च २०१२ तारखेच्या एका पत्रातही या घटनेचा उल्लेख आहे. चाकणच्या कांदा आंदोलनाविषयी वाचून फराटे खास त्यांना भेटायला म्हणून पुण्याला गेले होते व हे हजार रुपये त्यांच्या गावातल्य शेतकऱ्यांनी जमा केले होते. त्या काळात त्यांचा प्रवासाचा व इतरही अनेक प्रकारचा खर्च कार्यकर्तेच काही न बोलता परस्पर भागवत.
 अगदी सुरुवातीला भारतात परतल्यावर त्यांनी काही वर्षांच्या कालावधीत घेतलेली आधीची जीप व नंतरची अ‍ॅंबॅसडर ही दोन वाहने जुनी झाल्यावर रद्दबातल करावी लागली होती. त्यानंतरची काही वर्षे कार्यकर्त्यांनी पैसे गोळा करून त्यांच्यासाठी घेतलेली एक मोटार ते वापरत असत. अखेरच्या काही वर्षांत ते वापरत असलेली इनोव्हा मोटार वर्ध्याच्या रवी काशीकर यांनी वापरण्यासाठी दिली होती, तर ड्रायव्हर बबन शेलार हे कोपरगावचे भास्करभाऊ बोरावके यांनी दिले होते. पुढे त्यांचा प्रवास कमी होत गेल्यावर ते पुण्यातील जगताप नावाच्या भाड्याने ड्रायव्हर पुरवणाऱ्या गृहस्थांकडून कामानुसार कोणीतरी ड्रायव्हर मागवत असत. आंदोलनकाळात त्यांची अनेक गंभीर आजारपणेही झाली व बराच खर्च कार्यकर्त्यांनीच आपापसात पैसे गोळा करून भागवला होता.
 त्यागाचे हे ज्वलंत उदाहरण समोर असल्याने मिळेल तिथे हात मारून घ्यायचा, हा इतर संस्थांत वा पक्षांत दिसणारा प्रकार शेतकरी संघटनेच्या बाबतीत सहसा कधी घडलेला नाही.

 जमीन विकल्यामुळे उर्वरित आयुष्यात मात्र बऱ्यापैकी आर्थिक स्थैर्य जोशींच्या वाट्याला आले. पुण्याच्या बोपोडी भागात देवी ऑर्किड या इमारतीत दहाव्या मजल्यावर त्यांनी दोन सदनिका एकत्रित असलेली एक प्रशस्त सदनिका २००८ साली खरेदी केली. चारही बाजूंनी विहंगम दृश्य दिसायचे व ते बघायला त्यांना फार आवडे. त्यांची आयुष्याची शेवटची काही वर्षे तशी आर्थिकदृष्ट्या कसलीही ओढाताण न होता गेली..
 आर्थिक सुस्थिती आल्यानंतर त्यांनी आवर्जून केलेल्या एका गोष्टीचा इथे उल्लेख करायला हवा. ती होती शिवार अ‍ॅग्रो प्रॉडक्ट्स लिमिटेड या कंपनीच्या संदर्भात. खुल्या अर्थव्यवस्थेचे स्वागत करताना युरोप-अमेरिकेतील सुपर मार्केटच्या धर्तीवर खरेदी-विक्री केंद्रांची एक साखळी उभी करायला हवी असे ते म्हणाले होते. 'खुली अर्थव्यवस्था कोणासाठी थांबत नाही; अशी यंत्रणा तुम्ही उभी केली नाही तर दुसरे कोणीतरी करतीलच' असेही त्यांनी शेतकऱ्यांना निक्षून सांगितले होते. कोणीतरी कार्यकर्ता याबाबतीत पुढाकार घेईल याची तब्बल दोन वर्षे त्यांनी वाट बघितली. पण काहीच घडले नाही. मग त्यांनी स्वतःच ३१ ऑक्टोबर १९९३ रोजी औरंगाबाद येथील अधिवेशनात उपरोक्त कंपनीच्या स्थापनेची घोषणा केली. प्रत्यक्षात अपेक्षित भांडवल जमा झालेच नाही म्हणून आणि इतरही काही कारणांमुळे ती कंपनी कधी उभीच राहिली नाही. याबद्दल पूर्वी लिहिलेलेच आहे. 'शेतकरी संघटक'च्या ६ जानेवारी


४६६ - अंगारवाटा... शोध शरद जोशींचा