पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/५१४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



वैचारिक निष्ठा त्यांना अवघड वाटेने जातानाही कायम आत्मबळ देत राहिली.
  हाच आत्मविश्वास जोशींनी २१ फेब्रुवारी १९९८ मध्ये शेतकरी संघटकमध्ये लिहिलेल्या एका लेखातही दिसून येतो. मुळात स्वतंत्र भारत पक्षाच्या एका शिबिरात केलेले हे भाषण आहे. विशेष म्हणजे यात त्यांनी केलेले स्वतःचे मूल्यमापनही आपल्याला दिसते. जोशी लिहितात,

आजकाल माणसाचे मोजमाप करण्याच्या अनेक फुटपट्ट्या आहेत – पैसा किती गोळा केला? पदे किती मिळवली? खासदारकी मिळवली का? वगैरे, वगैरे. या सर्व फुटपट्ट्यांपेक्षा एक चांगली, महत्त्वाची फुटपट्टी आहे. स्वतःचे मूल्यमापन करायचे झाले, तर फक्त एका प्रश्नाचे उत्तर शोधा. या आयुष्यामध्ये स्वतःशी जास्तीत जास्त निष्ठा तुम्ही बाळगली का आणि त्यातला आनंद तुम्ही मिळवला का? 'माझ्या व्यक्तित्वाचा परिपोष करणे' या यात्रेपरता दुसरा आनंद नाही आणि ही यात्रा करताना मी जरी खड्ड्यात पडलो, अत्यंत वेदनामय परिस्थितीत सापडलो, नरकात पडलो तरीसुद्धा त्याची जी काही वेदना असेल ती माझी स्वतःची आहे आणि ती सहन करण्यातही मला आनंदच वाटतो, असे म्हणण्याची हिंमत ठेवली पाहिजे.
मी जिंकणार आहे; त्याबद्दल माझ्या मनात शंका नाही. आजची चकमक जिंकेन किंवा नाही याची मला खात्री नाही आणि त्याची मला पर्वाही नाही; पण मी युद्ध जिंकणार आहे याबद्दल माझ्या मनात तीळमात्रही शंका नाही. आज मोठे वाटणारे,आज सिंहासनावर बसणारे, आज हत्तीवर बसणारे उद्या पायउतार झाले, की त्यांचे इतिहासात नावसुद्धा राहत नाही. आज जी टीनपाट माणसे सत्तेच्या खुर्चीवर बसून, मोठी झालेली दिसतात, त्यांची नावे ज्या वेळी इतिहासाच्या पटलावरून पुसली गेलेली असतील, त्या दिवशी 'व्यक्तिस्वातंत्र्याच्या लढाई'करिता धडपडणारे लोक म्हणून तुमचे नाव त्या इतिहासात राहणार आहे.


(पोशिंद्यांची लोकशाही, पृष्ठ १४६-७)


  त्यांच्या दोन्ही मुली परदेशात स्थायिक झाल्या होत्या; मोठी कॅनडात व धाकटी युएसमध्ये. अनेक वर्षे ते घरी एकटेच राहत होते. शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते त्यांना सर्व मदत करत, अगदी रक्ताच्या नात्याचे कुणी घेणार नाही एवढी काळजी घेत, पण शेवटी ते अनुयायी व जोशी नेते हे नाते कायमच होते. व्यक्तिगत जिव्हाळ्याचा असा, ज्याच्यापाशी मनातील सर्व दुःखे मोकळी करावीत असा, जवळचा कोणी मित्र नव्हता. आयुष्याच्या अखेरी अखेरीस असे एकटेपण अनेकांच्या वाट्याला येते; त्यात फार जगावेगळे असे काही नाही; पण जोशींच्या बाबतीत एकटेपणाचा हा कालखंड खूपच लांबलेला होता आणि कितीही नाही म्हटले तरी त्याचा परिणाम जाणवत असे.



४९० - अंगारवाटा... शोध शरद जोशींचा