पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/५१७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जोशींचा विचार कधीच सीमित नव्हता. त्या मर्यादेत त्यांना बंदिस्त करणे हा त्यांच्यावरचा मोठा अन्याय होईल. स्वतंत्रतावादाची त्यांची मांडणी याच्या खुप पुढे जाणारी होती; किंबहुना सगळ्याच जगाला कवेत घेणारी होती. जोशींच्या विचारव्यूहात 'स्वातंत्र्याच्या वाढत्या कक्षा' ह्या संकल्पनेला सर्वाधिक महत्त्व होते. भारतीय शेतकरी त्यातील अगदी खालच्या पायरीवर होता. त्याचा सगळाच व्यवसाय सरकारी मगरमिठीत होता. आपल्या मालाची किंमत कुठलाही उत्पादक स्वतः ठरवतो, इथला शेतकरी याला अपवाद होता; आजही बऱ्याच प्रमाणात आहे. त्याची शेती म्हणजे कायमच त्याची गरिबी वाढवणारा, त्याला भांडवल खाऊन जगायला भाग पडणारा व्यवसाय होता; त्याला कायम लाचार ठेवणारा व्यवसाय होता. अशी कुठल्याही स्वरूपाची लाचारी जोशींना खूप क्लेशदायक वाटायची. म्हणूनच त्याचा निदान उत्पादनखर्च भरून निघावा, त्याला थोडेतरी स्वतःच्या पायावर उभे राहायचे बळ प्राप्त व्हावे, या उद्देशाने त्यांनी शेतीमालाला रास्त दाम ही एक-कलमी मागणी मांडली. पण लौकरच आपण याच्या पुढच्या पायरीवर जायला हवे, याची त्यांना जाणीव होती.
 दुर्दैवाने वेगवेगळ्या सरकारांनी या देशात अनुदान संस्कृती इतकी खोलवर रुजवली, की त्या अनुदानाचे जणू व्यसनच समाजाला जडले. प्रत्येक गोष्टीकरिता सरकारकडेच बघायचे, जेवढे म्हणून फुकटात मिळेल तेवढे सरकारकडून उकळायचे अशी भीकमागी, हावरी, मिळेल ते मिळेल तिथून ओरबाडून घेणारी संस्कृती तयार झाली. मतांसाठी राजकीय पक्षांनी आणि सरकारने आणलेल्या आमआदमीवादाने तिला खतपाणीच घातले.
 आंदोलक शरद जोशी जितके शेतकऱ्यांना भावले तितके नंतरचे खुल्या अर्थव्यवस्थेचे समर्थक जोशी त्यांना भावले नाही. शेतीमालाला अधिक भाव मिळावा म्हणून रास्ता रोको करायला लाखोंच्या संख्येने येणारे शेतकरी प्रयोगशेती आणि व्यापारशेती करायला उत्सुक नव्हते. योद्धा शेतकरी ही प्रतिमा व्यक्तिस्वातंत्र्याचा उद्घोष करणाऱ्या नेत्याच्या प्रतिमेपेक्षा शेतकऱ्यांना अधिक भावली. 'शेतीमालाच्या भावाचे राहू द्या, त्यापेक्षा आम्हाला शेतात मोबाइल टॉवर उभारायची परवानगी द्या; त्याचे भाडे आम्हाला घरबसल्या मिळत राहील' अशी मागणी जोशीच्या कानावर पडू लागली.
 अशा सगळ्या परिस्थितीत शरद जोशींच्या अमूल्य वारशाचे संवर्धन कसे करता येईल याचा विचार आपण साऱ्यांनीच करायला हवा.

शरद जोशींनी आम्हांला काय दिले?
 आपल्यापुढील बहुतेक प्रश्नांचे मूळ दारिद्र्यात आहे आणि या दारिद्र्याचे मूळ शेतकऱ्याच्या शोषणात आहे; शेतीमालाला उत्पादनखर्चावर आधारित वाजवी दाम मिळेल अशी व्यवस्था केल्याशिवाय हे दारिद्र्य कधीही दूर होणार नाही, हे प्रथमत: त्यांनीच शास्त्रशुद्ध पद्धतीने आम्हांला पटवून दिले. शेतीचे खरेखुरे, केवळ पुस्तकी नसलेले, असे अर्थशास्त्र मांडणारे ते पहिलेच.
 'इंडिया विरुद्ध भारत' या द्वंद्वाची मांडणी करून भारताचे मूलभूत दुभंगलेपण अधोरेखित

सांजपर्व - ४९३