पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/५३

हे पान प्रमाणित केलेले आहे.

जसा शहरांचा विकास होतो, तसे तसे नवे विभाग विकसित होत जातात व त्यांना नवे पिनकोड द्यावे लागतात; पण त्यांची तजवीज मूळ नियोजनातच करून ठेवावी लागते. प्रत्येक विभागाला किती कर्मचारी लागतील, याचाही अंदाज घ्यायचा असतो. असे मोठे देशव्यापी प्रकल्प कधीच एखाददुसऱ्या व्यक्तीच्या हातात नसतात, त्यामुळे त्यांचं श्रेय कोणाही एका व्यक्तीला देणं चकीचं ठरेल; पण यात वेलणकरांचा नक्कीच मोठा हिस्सा होता व मी त्यांच्या हाताखाली काम करत होतो. माझे ते दिवस आनंदात गेले. त्या काळातलं माझं एक निरीक्षण मला पुढे खूप महत्त्वाचं वाटलं होतं. शहरातील वेगवेगळ्या टपाल पेट्यांमध्ये टाकली जाणारी बहुतेक पत्रं त्या किंवा अन्य मोठ्या शहरातच जायची; जेमतेम १०% पत्रं ग्रामीण भागात जात. अन्य विकसित जगापेक्षा भारताचं हे एक वेगळेपण होतं. ग्रामीण भारताचं तुटलेपण दाखवणारं. वेलणकर एक उत्तम बॉस होते. कामाव्यतिरिक्तही आम्ही दोघं खूप गप्पा मारायचो. ते संस्कृतचे जाणकार होते. माझाही तो आवडीचा विषय. एकूणच आम्हा दोघांचं चांगलं जळायचं. माझ्या नोकरीच्या काळात भेटलेल्या ज्या फार थोड्या व्यक्तींविषयी माझ्या मनात आदर आहे, त्यांच्यापैकी ते एक आहेत."

 दिल्लीतील नेमणुकीचा एक फायदा म्हणजे अनेकदा विदेशप्रवास करायची जोशींना संधी मिळाली. युनिव्हर्सल पोस्टल युनियन (ऊर्फ युपीय) ही युनायटेड नेशन्सची (संयुक्त राष्ट्रसंघाची) एक घटकसंस्था. भारतही अर्थातच युपीयुचा एक सदस्य आहे. युपीयुच्या परिषदांसाठी दोन-तीन वेळा ते परदेशी गेले. इतरही दोन-तीन विदेशफेऱ्या झाल्या. सरकारी अधिकारी म्हणून परदेशी जाणे म्हणजे तशी चैनच असायची. पंचतारांकित हॉटेल्स. मेजवान्या. बड्या लोकांशी ओळखी. हा सगळा भाग म्हणजे अशा नोकरीतील 'पस'. शिवाय हे विदेशभ्रमण वैचारिक क्षितिज रुंदावणारेही होते.

 ह्या पोस्टिंगमध्ये २० ऑगस्ट १९६७ ते ३० मार्च १९६८ अशा सात महिन्यांसाठी त्यांना फ्रान्सला जायची संधी मिळाली. तेथील टपालयंत्रणेचा अभ्यास करण्यासाठी. त्यासाठी फ्रान्स सरकारने त्यांना स्कॉलरशिप दिली होती. ते एकटेच गेले होते की सहकुटुंब गेले होते याची नोंद मात्र उपलब्ध कागदपत्रांत दिसली नाही.

 पहिले चौदा आठवडे फक्त फ्रेंच भाषा शिकण्यासाठी विशी येथील जगप्रसिद्ध फ्रेंच भाषा अध्ययन केंद्रात ते जात होते. त्यांच्या बॅचमध्ये एकूण २१ देशांतील ४२ प्रशिक्षणार्थी होते व सगळ्यांचेच त्या प्रशिक्षणाबद्दल अतिशय चांगले मत झाले. ह्या फ्रेंचचा पुढे त्यांना खूप उपयोग होणार होता. त्यापूर्वी भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयातर्फे दिल्लीत चालवल्या जाणाऱ्या स्कूल ऑफ फॉरिन लँग्वेजेस या संस्थेत जोशी एक वर्ष रोज संध्याकाळी जात होते, पण तिथे वर्षभर जाऊनही त्यांचे फ्रेंचचे ज्ञान अगदीच तकलादू होते. याउलट विशीतल्या संस्थेत मात्र चौदा आठवड्यांत ते उत्तम फ्रेंच बोलू लागले. त्यानंतर आयुष्यात कधीच त्यांना फ्रेंच भाषेत आपले विचार व्यक्त करण्यात अडचण आली नाही. त्यांच्या मते याचे कारण म्हणजे विशी येथे वापरात असलेली प्रशिक्षणाची दृक्-श्राव्य (audio-visual) यंत्रणा. खरे

व्यावसायिक जगात५३