पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/७५

हे पान प्रमाणित केलेले आहे.

तथाकथित मदतीचा उपयोग होत होता. हे काही प्रमाणात अपरिहार्यही होते. कारण मुळात कुठल्याही राष्ट्राला विकास करण्यासाठी ज्या प्रकारच्या इन्फ्रास्ट्रक्चरची गरज होती व नंतर ज्या प्रकारच्या उद्योगांची गरज होती, ते उभारण्यासाठी लागणारी यंत्रसामग्री व तंत्रज्ञान हे श्रीमंत राष्ट्रांकडेच उपलब्ध होते. गरीब देशांतून येणाऱ्या कच्च्या मालाच्या किमती कायम कमी व श्रीमंत देशांतून निर्यात होणाऱ्या पक्क्या मालाच्या किमती कायम जास्त हे व्यापारातले वास्तव विदारक होते. 'मदत' या शब्दाला त्यामुळे काही अर्थच उरत नव्हता.
 याचवेळी आपण देत असलेल्या मदतीची रक्कम अविकसित देशांतील अभिजनवर्ग स्वतःच खाऊन टाकतो व खऱ्या गरजू लोकांना काहीच मिळत नाही हे मत त्यावेळी अनेक पाश्चात्त्य वृत्तपत्रांमधून अधोरेखित होत असे. एखाद्या आफ्रिकन देशातील राजा आपल्या अल्सेशिअन कुत्र्याला चिकन भरवतो आहे व त्याचवेळी त्याच्या देशातील हजारो सामान्य लोक उपाशी मरत आहेत अशा प्रकारची व्यंग्यचित्रे वृत्तपत्रांतून प्रसिद्ध होत होती. पाश्चात्त्य समाजात त्यामुळे गरीब देशांना 'मदत' द्यायला विरोध वाढू लागला.

 स्वतः जोशी यांचा अनुभवही या मताला दुजोरा देणारा होता. ते जेव्हा आपल्या कामाचा भाग म्हणून वेगवेगळ्या अविकसित देशांमध्ये जात, त्यावेळी त्यांनीही त्या देशांतील वाढती अंतर्गत विषमता बघितली होती व जागतिक पातळीवरील गरीब व श्रीमंत राष्ट्रांमधील विषमतेपेक्षा ती अधिक भयावह होती. विशेषतः आफ्रिकेतील नायजेर ह्या देशामधील अनुभव त्यांना बराच अंतर्मुख करून गेला. तिथे त्यांनी बघितले, की देशाच्या राजधानीचा थोडासा भाग खूप श्रीमंत दिसतो, तिथे बडी बडी हॉटेल्स आहेत, विदेशी मोटारी, सौंदर्यप्रसाधने, अत्याधुनिक उपकरणे, कपडे हे सर्व काही ठरावीक दुकानांतून उपलब्ध आहे व एकूणच राज्यकर्ता वर्ग व इतर सत्ताधारी ऐषारामात जगत आहेत. अगदी युरोपातील उच्चवर्गीयांप्रमाणेच त्यांची जीवनशैली आहे. पण त्याचवेळी त्या देशातील बहुसंख्य जनता मात्र भीषण दारिद्र्यात सडत आहे.
 जोशींनी हेही बघितले होते, की वेगवेगळ्या अविकसित देशांची मोठी मोठी शिष्टमंडळे युएनच्या परिषदांसाठी वा अन्य कार्यक्रमांसाठी युरोप-अमेरिकेत जातात तेव्हा त्यांचा एकूण दृष्टिकोन हा केवळ सरकारी पैशावर परदेशात मजा मारणे हाच असतो; प्रत्यक्षात संयुक्त राष्ट्रांकडे भीक मागण्याच्या पलीकडे ती काहीच करत नाहीत आणि मुख्य म्हणजे आपल्या देशाचा विकास व्हावा अशी तळमळही ह्या बड्या मंडळींना नसते; ते केवळ स्वतःची चैन आणि स्वार्थ एवढेच पाहत असतात.

 त्यांचे एक निरीक्षण असे होते, की ह्या गरीब देशांतील नेते एखाद्या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी न्यूयॉर्कसारख्या ठिकाणी गेले, की नेहमी आलिशान गाड्यांमधूनच फिरायचे व त्याउलट श्रीमंत देशांतील नेते मात्र तुलनेने साध्या गाड्या वापरत. हाच फरक कपडे, खाणेपिणे, दैनंदिन राहणी ह्या सगळ्यातच उघड दिसायचा. म्हणजे बोलताना आपण गरीब देशांच्या जनतेचा आवाज उठवतो आहोत असा आविर्भाव आणायचा, पण स्वतःच्या दैनंदिन

डोंगरकुशीतल्या नंदनवनात७५