या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
भाग १ ला.


परिचय झाला आहे. या वृत्तांतांत त्यानें आपल्या अंतःकरणाच्या गुह्य गोष्टी प्रगट करून आपले दोष प्रांजलपर्णे कबूल केले आहेत व आपल्या महत्वाकांक्षा सविस्तर कळविल्या आहेत. त्यावरून पाहतां आपणाला अर्से वाटेल कीं, त्याला संधि मिळाली असती तर कदाचित् त्यानें आपल्या राज्यपद्धतींतील वरील दोप काढून टाकले असते. परंतु, कर्मधर्मसंयोगानें त्याला अशी संधिच मिळाली नाहीं. पानिपतच्या पहिल्या लढाईमुळे बाबराला हिंदुस्थानच्या वायव्येकडील प्रांत मिळाले. या लढाईपासून तो त्याच्या मरणापर्यंत जो काळ लोटला तो इतका थोडा होता कीं, त्या अवसरांत जिंकिलेले प्रांत निर्धास्त करणें व त्यांत नवीन मुलुखांची भर घालणे, याहून दुसऱ्या कोणत्याही गोष्टींचा विचार त्यास करितां आला नाहीं. समरांगणी लढाई जिंकून त्याचा हिंदुस्थानांत प्रवेश झाला, व पुढे आग्रा एथें त्याने पांच वर्षे राज्यकारभार चालविला, तो विजयी योद्धा ह्याहून कोणत्या ही स्निग्धतर नात्याने चालविला नाहीं.
 बाबराला ज्या कामाकडे दुर्लक्ष करणे भाग पडलें तें काम तडीस नेण्याची कर्तृत्वशक्ति त्याचा मुलगा हुमायून यामध्ये स्वाभाविकतःच नव्हती. त्याचा स्वभाव अधीर व चंचल असून त्याच्यांत योजक बुद्धीचा अभाव होता, तेव्हां अर्थात या दोन्ही गोष्टींमुळे तो या कामास सारखाच अयोग्य होता. त्यानें हिंदुस्थानांत आठ वर्षे राज्य केलें. पण या अवकाशांत स्थायिक राज्याच्या पायाचा एकही दगड त्याने बसविला नाहीं. नंतर, पूर्वी होऊन गेलेल्या अफगाण राजांचे राज्यवृक्ष, देशांत पाळेमुळे खोलवर न गेल्याकारणानें, जसे कोसळून पडले, त्याप्रमाणेंच या आठ वर्षांचे अखेरीस हुमायुनाचा ही राज्यद्रुम कोसळून पडला; व असा परिणाम समरांगणांत फक्त एकदां पराभव होतांच घडून आला. सिंधुनदाचे दक्षिणेस बाबरानें जेवढे ह्मणून मिळविलें होतें तें सर्व एका धक्यासर्शी पार नाहींसें झालें. तेव्हां हिंदुस्थानची राज्यसत्ता मोंग - लांच्या हातांतून कायमची निघून गेली; असें निदान दिसले तरी खरें.