या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४
अकबर बादशहा.

 या नवीन राज्यांत बाबराचे पाय भुईस लागतात न लागतात तोच . त्यास भेरा प्रांतावर स्वारी करण्याचे निमंत्रण आलें. हा प्रांत जेहल- मच्या दक्षिणेस हिंदुस्थानच्या सरहद्दींत होता. हें निमंत्रण बाबरचे इच्छेनुरूप असून इतकें प्रिय होतें कीं त्याच्यानें तें नाकारवेचना. तो तसाच जलालाबादेस जाण्यास निघाला. ही गोष्ट जानेवारी १९०९ मध्ये घडली. ईश्वराच्या कृपेनें संपन्न असलेला हा एशियाचा भाग जेव्हां त्यास प्रथम दृग्गोचर झाला, तेव्हां आपले मनावर झालेल्या ग्रहाची नोंद सुलतान बाबर ( त्यास या वेळीं किताब मिळालेला होता ) ह्यानें आपले रोजनिशीत केली आहे. त्यानंतर हिंदुस्थानावर ज्यांनी ज्यांनीं स्वाऱ्या केल्या त्यांचा ग्रह याप्रमाणेच झाला होता ही गोष्ट निर्विवाद आहे; व त्यांच्या स्वाया करण्याचा जो कृतसंकल्प होत असे त्याचें बीज तरी हेच. बाबर याने असें लिहिलें आहे की " उष्ण प्रदेश किंवा हिंदुस्थान देश हे या पूर्वी मीं कधींच पाहिले नव्हते. तेर्थे पाऊळ पडल्याबरोबर एक नवीनच सृष्टि उदयास आली असें मला वाटलें. तेथील वनस्पति, वेली, झार्डे, जंगली जनावरें सर्व प्रकारचीं तीं पाहून मी आश्चर्यचकित झालों व खरोखर तें सर्व स्थळ विस्मित होण्यासारखंच आहे. " नंतर बावर खैबरघाटाच्या रस्त्यानें पेशावरास गेला; व सिंधुनद न ओलांडितां, बंगाश, बानू, व देश्दन या गांवांवरील मार्गानें मुलतानास गेला. तेथून तो सिंधुनदाच्या कांठानें कांहीं दिवस फिरून पश्चिमेकडेस वळला, व छोटियाली आणि गिझनीच्या रस्त्यानें काबुलास परत गेला. या मोहिमेस बाबरानें केलेली हिंदुस्थानची पहिली स्वारी ह्मणतात. परंतु हींत तो केवळ या देशाच्या सरहद्दीवरूनच गेला ; त्या अर्थी या मोहिमेस पुढील स्वाऱ्या करावयाच्या प्रांतांची टेहळणी हेंच नांव शोभतें. या टेहळणीमुळे, ह्या प्रदेशांतील अधिक भाग पाहण्याचा पुनः लौकरच योग जुळवून आणावा अशी त्यास उत्कट इच्छा उत्पन्न झाली.