या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ३ )

 लहानपण व मोठेपण यांजविषयींचा आपणांत भ्रांतिमूलक समज आहे. ज्यानें आपल्या बांधवांचे गळे कापून सात तालाची माडी उभा- रिली आहे व जो नेहमीं दोन घोड्यांच्या फेटणींतून वस्त्रालंकारांनीं भूषित होऊन फिरतो, तो मोठा व सन्माननीय मानिला जातो; व जो कोणी आपल्या कर्तव्यास स्मरून परद्रव्य लोष्टवत् मानितो व आपल्या निढळाच्या घामानें जें कांहीं प्राप्त होईल, त्यांतच संतुष्ट राहतो तो लहान व अनादरणीय समजला जातो. याचे कारण इतकेंच की, सामा- न्यजन अदूरदृष्टीचे आहेत व त्यांस खरी थोरवी समजत नाहीं. थोर पुरुषांच्या चरित्रांचें मनन केलें असतां हा घातुक समज नाहींसा होण्या- सारखा आहे.
 या आपल्या आर्यभूमींत आजपर्यंत अनेक पुरुषरत्ने होऊन गेलीं. त्यांनीं आपल्या हयातींत जनसमुदायावर अनेकप्रकारें उपकार करून त्यांच्या सुखांत भर घालण्याकरितां अश्रांत व जिवापाड मेहनत केली. असे जे महापुरुष अर्वाचीनकाळीं होऊन गेले, त्यांत अकबरबादशहाची प्रमुखत्वेंकरून गणना आहे. त्याचें हें अल्पचरित्र वाचकांस सादर केले आहे. या सेवेचा आदर पुरुषमाहात्म्यासाठी तरी होईल अशी उमेद आहे.
 हें पुस्तक भाषांतररूपानें लिहिलें आहे. यांत फक्त अकबरबादश- हार्चेच इतिवृत्त आहे असें नाहीं, तर एकंदर मोंगलबादशाहीचा उत्कर्ष कोणी व कसकसा केला याची साद्यन्त व खुलासेवार माहिती दिलेली आहे. मूळचें इंग्रजी पुस्तक एका नामांकित ग्रंथकारानें लिहिलें असून तें विद्वज्जनांच्या आदरास पात्र झालें आहे. त्याची ही प्रतिकृति, मागसलेला ह्मणून गणलेल्या प्रांतांतील एका गावांत असणाऱ्या व वाग्- देवीच्या मंदिराचा उंबरठा देखील ज्यानें ओलांडिला नाहीं, अशा एका प्रसिद्ध साहसिकानें महाराष्ट्र भाषेत उतरविण्याचे धाडस केलें आहे.