पान:अक्षर गौरव - शतकोत्तर हीरक महोत्सव स्मरणिका.pdf/२७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आण्णा मी आणि वाचन

प्रा. अजित पाटील


 तेव्हा मी सहावीत असेन, आण्णांना (म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील) रोज सकाळी सकाळी ताजी वर्तमानपत्रे लागत. त्यावेळी उपलब्ध असलेली सर्व वर्तमानपत्रं आण्णा घेत. आण्णा ती सर्व वर्तमानपत्रं अगदी हेडलाईन पासून ते छोट्या जाहिरातीपर्यंत काळजीपूर्वक वाचून काढत. कुणी गरजू नोकरीसाठी यालाच तर त्याला ती जाहिरात दाखवून अर्ज करायला सांगत. आम्ही चौघं भावंडं मी, अनिल, जयश्री आणि मोहन. मी त्यावेळी सर्वात मोठ्या असल्यानं थोडा समजूतदार होतो. वर्तमानपत्र वाचतेवेळी आण्णा मला बोलावून घेत आणि वर्तमानपत्रातले अग्रलेख मोठ्यानं वाचायला सांगत. सहावीतलं वय हे अग्रलेख समजण्याइतपतचं वय नक्कीच नव्हतं. मला ते अग्रलेख समजतंही नसत. अगदी बोअरिंग वाटत. मग मी चरफडत वाचे. आण्णांना ते समजे. ते म्हणते, 'हे बघ मी तुला अग्रलेख वाचायला सांगतो याचं महत्व तुला पुढ समजेलं. मग आण्णा मला अग्रलेख समजून देवू लागले आणि मला वर्तमानपत्राची आवड निर्माण झाली. ती मी गोडीनं वाचू लागलो आणि येवढेच नव्हे तर आण्णांच्या अगोदर मी वर्तमानपत्रावर झडप घालू लागलो. पुढं आण्णांचं म्हणणं खरं ठरलं. बारा गावचं पाणी न पिता ही मी वाचनं प्रगल्भ झालो. जीवनाची सगळी अंग मला समजू लागली. माझं वाचन पुढं शाळेपर्यंत पोहाचलं. शाळेनं माझी बातमी मंत्री म्हणून नेमणूक केली. मग मी वर्तमानपत्रातल्या राजकारण विरहीत विरहीत बातम्या लिहून घेऊन शाळेतल्या फळ्यावर लिहू लागलो. मग त्या वाचण्यासाठी मुलांची झुम्मड उडू लागली. येवढच काय तर शिक्षकही माझ्याकडं, 'काय पाटील आज विशेष काय ?' म्हणून विचारत, त्या वेळी सर्वसामान्यांकडच काय पण शिक्षकांकडही वर्तमानपत्र येत नसत. त्यांच्या तुटपुंज्या उत्पन्नात ती बसत नसत. माझी वाचनातली aises बघून आण्णांनी शिवाजी कॉलेजचे ग्रंथपाल वाडकर यांना बोलावून घेतलं आणि सांगितलं की 'वाडकर याला चांगली पुस्तक वाचायला देत चला. 'नंतर मी दर उन्हाळ्याच्या सुट्टीत मोठी पिशवी घेवून बसनं शिवाजी कॉलेजच्या ग्रंथालयात जात असे आणि पिशवीभर पुस्तकं घेऊन येत असे आणि ती अधाशासारखी वाचत असे.
 आण्णांच्यानंतरही हा पायंडा तसाच पुढं राहिला तो अगदी नोकरीच्या निवृत्तीपर्यंत. प्राध्यापक असताना शिवाजी, धनंजयराव गाडगीळ आणि यशवंतराव इन्स्टिट्यूट ऑफिसच्या ग्रंथालयांची दार मला स्वर्गाची दारं वाटत.
 आता निवृत्त झाल्यावर कॉलेजकडं मी फारसा फिरकत नाही. पण डॉ. राजेंद्र मान्यांनी मला नगर वाचनालयाचं लाईफ मेंबर करुन घेतलय त्यानं ही उणीव फारशी जाणवत नाही. आजही मी रविवारची महाराष्ट्र टाईम्स, लोकसत्ता, सकाळ, पुढारी, लोकमत, ऐक्य आदी वर्तमानपत्रं विकत घेतो. त्यांच्या पुरवण्यावर दोन चार दिवस छान जातात.