पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/१७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१ पाडळीतल्या पाऊलखुणा वळणावळणाची व चढावाची वाट तुडवत खूप लांबवर जावे, तेव्हाच कुठेतरी अकस्मात खरे विहंगम दृश्य दिसते असा बहुतेक गिर्यारोहकांचा अनुभव असतो. नाशिक जिल्हा आणि अहमदनगर जिल्हा यांच्या सीमेवरील सिन्नर तालुक्यातल्या पाडळी गावाच्या बाबतीत हे अगदी खरे आहे. गाव आहे खूप सुंदर पण तितकेच जाण्यासाठी दुर्गम. खिंडीची अवघड वाट ओलांडून अगदी जवळ पोचल्याशिवाय डोंगरांच्या कुशीत दडलेले हे गाव दिसतच नाही. पण दिसते, तेव्हा डोळ्यांचे पारणे फिटते. वाढत्या लोकवस्तीचा ताण, जंगलतोड, प्रदूषित नद्यानाले वगैरे अनेक कारणांमुळे महाराष्ट्रातील एकेकाळची बहुतेक टुमदार गावे आज अगदीच बकाल झालेली आहेत, पण पाडळीचे सौंदर्य मात्र आजही बऱ्यापैकी टिकून आहे. गावाला तिन्ही बाजूंनी वेढणाच्या डोंगररांगा आजही निळ्या आकाशात झेपावताना दिसतात, गावालगत वाहणा-या म्हाळुगी नदीचा प्रवाह आजही खळाळता आहे, शिवारातल्या शेतांमधली हिरवीगार टवटवी आजही डोळे निववते. अशा या निसर्गरम्य पाडळी गावात रावसाहेब पांडुरंग शिंदे यांचा जन्म झाला. शाळेत झालेल्या नोंदीनुसार १० जून १९२८ रोजी. वडील पांडुरंग विठोबा शिंदे हे गावचे पाटील. त्यांना सगळे दादा म्हणत. आईंचे नाव आनंदी. त्यांना सगळे बाई म्हणत. थोरले रामचंद्र (ऊर्फ पाटीलभाऊ), नंतरचे अण्णा (ऊर्फ अण्णासाहेब ) आणि धाकटे रावसाहेब असे तीन मुलगे. तसेच चहाबाई, जयाबाई, इंदूबाई व सिंधूताई अशा चार मुली. (विस्तृत वंशावळ परिशिष्ट तीनमध्ये) त्यांचे माडीचे घर गावातल्या शंभरएक घरांमधले सगळ्यांत मोठे आणि गावच्या तीनशे एकरांच्या शिवारातले सर्वांत मोठे शेतही त्यांचेच. गावाचे रक्षण करण्याची जबाबदारी पाटलांचीच. एकूणच गावात पाटलांना खूप प्रतिष्ठा होती आणि ती पूर्वापार चालत आली होती. शिंदे कुटुंबाच्या शेताला एकेकाळी भोवताली चिवट पक्क्या पांढऱ्या पाडळीतल्या पाऊलखुणा...