पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/३७१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मुलांनी व नातवंडांनीही रयतच्या शाळेतूनच शिकावे यासाठीही हे शिक्षक उद्या तितकेच उत्सुक असतील. रयतच्या काही मर्यादा तशा सुस्पष्ट आहेत. बहुसंख्य माणसांची सहजप्रवृत्ती ही स्वतःच्या जगण्याचा स्तर हा अधिकाधिक उंचीवर नेण्याची असते. एका खोलीत राहणाऱ्याला दोन खोल्यांची जागा हवी असते आणि दोन खोल्यांच्या जागेत राहणाऱ्यांचे स्वप्न तीन खोल्यांच्या जागेचे असते. रयतमध्ये शिकलेल्यांनाही आपली मुले रयतपेक्षा अधिक चांगल्या शाळांमध्ये शिकवावीशी वाटली तर त्यात काहीही वावगे नाही. दर्जेदार शिक्षणासाठी रयत प्रसिद्ध आहे का? वेगवेगळ्या शैक्षणिक प्रयोगांची जेव्हा चर्चा होते, तेव्हा त्यात रयतचा सहभाग वा उल्लेख असतो का? रयतमधील मुले कॉर्पोरेट जगात चमकतात का? आपापल्या जीवनक्षेत्रात ती सर्वोच्च पदावर पोचतात का ? रयतच्या बहुसंख्य माजी विद्यार्थ्यांची रयतसाठी थोडातरी त्याग करायची आज तयारी आहे का? रयतशी संबंधित मान्यवरांनी जी स्वतःच्या शिक्षणसंस्थांची उभारणी केली आहे ती त्यांनी रयतचे प्रारूप (मॉडेल) डोळ्यांपुढे ठेवून केली आहे का ? या प्रश्रांची प्रामाणिक उत्तरे बऱ्याच प्रमाणात नकारात्मक येतील. पण त्या उत्तरांमध्ये प्रतिबिंबित न होणारा असा एक वास्तवाचा फार मोठा भाग आहे; एकूण समाज सोडाच अगदी रयतशी संबंधित मंडळींनाही त्या वास्तवाची फारशी जाणीव नसते ही खरी शोकांतिका आहे. इंग्रजांनी ज्यावेळी मुंबई प्रांतात शिक्षण खाते सुरू केले व सरकारी शाळा सुरू केल्या त्यावेळी, म्हणजे १८१८ साली झालेल्या पेशवाईच्या अस्तानंतरच्या काळात, सरकारी शाळांमध्ये सर्वच जातिजमातींना मुक्त प्रवेश होता. धर्माने वा जातिव्यवस्थेने तलेली सर्व • सरकारी शाळाखात्याने पहिल्या दिवसापासूनच पार झुगारून दिली होती. पण त्यानंतर शंभर वर्षे, म्हणजे चार-पाच पिढ्या उलटून गेल्यावरही, ग्रामीण भागातल्या बहुजनसमाजातली मुले शाळेत जायला फारशी तयार नव्हती. मुलांना या शाळांमध्ये घालण्यापासून पालकांना कोणीही रोखले नव्हते आणि तरीही ही मुले शिक्षण घेत नव्हती. त्यांना शिक्षणाचे महत्त्व समजावून द्यायचे महत्त्कार्य आधी महात्मा फुलेंनी आणि यानंतर कर्मवीर भाऊराव पाटलांनी केले. त्यांचे हे कार्य ऐतिहासिक होते आणि त्याचे श्रेय रयतपासून कोणीच हिरावून घेऊ शकणार नाही. सहकारी साखर कारखाने, दूधसंघ वा पतपेढ्या यांना थोडेफारतरी शिकलेले कर्मचारी ग्रामीण भागात मिळू शकले त्याचेही श्रेय रयतच्या शाळांना द्यावे लागेल. कर्मवीरांच्या वाटेने... ३७१