पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/१२२

हे पान प्रमाणित केलेले आहे.

त्यांच्या आयुष्याचे ध्येय असतं. आपल्या हातून सतत भरीव कामगिरी झाली पाहिजे, अशी इच्छा त्यांच्या ठायी वास करीत असते. मात्र अशा कर्मचाऱ्यांंमध्येही दोन प्रकार आहेत. पहिल्या प्रकारच्या कर्मचाऱ्यांंना कामातच आनंद वाटतो. कार्यप्रवण राहण्यासाठी त्यांना बाहेरच्या प्रेरणेची आवश्यकता वाटत नाही. दुसऱ्या प्रकारचे कर्मचारी आपली इतर दुःखं किंवा समस्या विसरण्यासाठी कामाला जुंंपून घेतात. त्यांना 'वर्कोहोलिक्स' म्हणतात. दुःख विसरण्यासाठी जसे कित्येक जण दारूचा आधार घेतात तसं हे कामाचं व्यसन लावून घेतात.
 कामसू कर्मचाऱ्यांंना संस्थेत मोठा आदर व मान मिळतो. संस्था त्यांच्यावर अवलंबून असते. आपल्याप्रमाणे इतरांनीही कार्यमग्न असावं, आपलं अनुकरण करावं, यासाठी ते प्रयत्नशील असतात. त्यांची संस्थेतील संख्या १० टक्क्यांहून अधिक झाल्यास संस्थेच्या कामगिरीत लक्षणीय प्रगती होते. त्यांचे प्रमाण २० टक्क्यांपर्यंत पोहचतं, तेव्हा संस्थेची कामगिरी अतुलनीय होते.
'प्रवासी' कर्मचारी :
 केवळ कामगार संघटनांचे सदस्य असल्याने कामावर टिकून राहिलेले कर्मचारी म्हणजे प्रवासी कर्मचारी. त्यांना संघटनेचंं संरक्षण असतं. त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई करणं अवघड असतं. कामचुकारपणा, आज्ञापालन न करणं, न कळवता गैरहजर राहणं, स्वतःचे काम सोडून दुसऱ्याच्या उचापती करणं, अन्य कर्मचारी कामात असताना त्यांना आपल्या अडचणी विचारून त्रास देणं, अन्य कर्मचाऱ्यांचे लक्ष विचलित करणंं इत्यादी 'गुणां'नी ते संपन्न असतात. ज्या संस्थेत संघटीत कामगारवर्ग आहे, तेथे अशा कर्मचाऱ्यांची संख्या मोठी असल्याचं आढळून आलंं आहे. कामगार संघटनांमुळे मिळणाच्या संरक्षणाचा ते पुरेपूर फायदा उठवितात.
 अशा कर्मचाऱ्यांंकडून टोकाचा शिस्तभंग घडतो, तेव्हा व्यवस्थापन त्यांच्यावर कारवाई करते. मात्र कामगार कायदे, न्यायालयांनी दिलेले आश्चर्यकारक निकाल,राजकीय दबाव यामुळे अशा कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घ्यावे लागल्याची कैक उदाहरणंं आहेत. यामुळे 'प्रवासी'पणास अधिकच उत्तेजन मिळतंं. त्यांच्याबाबतची सर्वात मोठी समस्या म्हणजे त्यांचा श्रमसंस्कृतीवर विश्वास नसणंं ही होय. काम करणंं महत्वाचंं व अत्यावश्यक आहे असं त्यांना वाटतच नाही. काम सोडून ते इतर काहीही करावयास तयार असतात. कामसू कर्मचाऱ्यांच्या उलट त्यांना कामचुकारपणाचं व्यसन असतंं. काम कसं करावं यासंबंधी विचार करण्यापेक्षा सुटी कशी एन्जॉय करावी याचा विचारच त्यांच्या मनात अधिक घोळत असतो.

 आपण काम करीत नाही.त्यामुळे आपली चेष्टा होते याची त्यांना जाणीव असते.

अद्भुतदुनिया व्यवस्थापनाची/११३